पद्मसिंह पाटील यांनी माझ्या हत्येची सुपारी दिली होती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 06:58 AM2019-07-10T06:58:35+5:302019-07-10T06:59:21+5:30

अण्णा हजारे यांची कोर्टात साक्ष; पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण

Padmasingh Patil gave my the supari of my murder | पद्मसिंह पाटील यांनी माझ्या हत्येची सुपारी दिली होती

पद्मसिंह पाटील यांनी माझ्या हत्येची सुपारी दिली होती

googlenewsNext

मुंबई : तत्कालीन खासदार पद्मसिंह पाटील यांनी माझ्या हत्येची सुपारी दिली होती. पाटील हे शरद पवारांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे माझ्या तक्रारीची कुणीही दखल घेत नाही. मला मिळालेल्या धमकीबाबत मी मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत सगळीकडे दाद मागितली होती, अशी साक्ष ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विशेष सीबीआय न्यायालयात मंगळवारी दिली.


काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांच्या २००६ मधील हत्येप्रकरणी अण्णांची मंगळवारी साक्ष नोंदविली. जुलै २०११ पासून खटल्याला सुरुवात झाली. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, पाटील यांनी राजकीय वैमनस्यातून निंबाळकर यांची हत्या केली.


माजी खासदार पद्मसिंह पाटील या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. तेरणा साखर कारखाना भ्रष्टाचार प्रकरणी पाटील यांच्याविरोधात अनेक पुरावे सादर केले होते. तरीही कोणतीही कारवाई झाली नाही. त्याचा निषेध म्हणून मी पद्मश्री, वृक्षमित्र पुरस्कार परत केले. मी उपोषणाला बसलो, त्यानंतर सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. पी. बी. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमला. चौकशीत पाटील दोषी ठरल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्याचा राग मनात ठेऊन त्यांनी मला जिवे मारण्यासाठी सुपारी दिली होती. याची माहिती मला प्रसारमाध्यमांद्वारे कळली, असेही अण्णांनी कोर्टाला सांगितले.


मी तक्रार मागे घ्यावी म्हणून माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता. पाटील यांच्या माणसांनी माझ्या कार्यकर्त्यांकडे कोरा चेक सोपवला. त्यात हवी ती रक्कम टाका, अशीही त्यांनी आॅफर दिल्याची साक्ष अण्णांनी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आनंद यवलकर यांना सांगितले.


पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी यांनी या खटल्यात सरकारी वकिलांचे साक्षीदार म्हणून अण्णा हजारे यांची साक्ष नोंदवावी, असा अर्ज विशेष न्यायालयाला केला होता. मात्र, विशेष न्यायालयाने त्यांची साक्ष या खटल्याच्या दृष्टीने महत्त्वाची नसल्याचे म्हणत अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आनंदीदेवी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयानेही त्यांना दिलासा दिला नाही. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला. सर्वोच्च न्यायालयाने अण्णा हजारे यांची साक्ष नोंदविण्याचे निर्देश विशेष न्यायालयाला दिले. त्यानुसार अण्णांची साक्ष झाली.

२०१२ मध्ये खटला मुंबई सत्र न्यायालयाकडे वर्ग
पाटील यांच्यासह लातूरचा व्यावसायिक सतीश मंदाडे, नगरसेवक मोहन शुक्ला, पारसमल जैन, माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी, बहुजन समाज पक्षाचा कार्यकर्ता कैलाश यादव आणि शुटर्स दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटे पांडे हेसुद्धा या खटल्यात आरोपी आहेत. अनेक साक्षीदार फितूर होत असल्याने २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा खटला अलिबाग सत्र न्यायालयातून मुंबई सत्र न्यायालयाकडे वर्ग केला.

Web Title: Padmasingh Patil gave my the supari of my murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.