मुंबई - संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित, बहुप्रतीक्षित तसंच रिलीजपूर्वी वादाच्या चक्रात अडकलेल्या 'पद्मावत' सिनेमाविरोधात निदर्शनं करणा-या करणी सेनेच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयाबाहेर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वेळीच हस्तक्षेप करत पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
पद्मावत 25 जानेवारीला बॉक्सऑफिसवर झळकणार
पद्मावत सिनेमा 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. तर त्याच दिवशी अक्षय कुमारचा बहुचर्चित 'पॅडमॅन'ही सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे. त्यामुळं यापैकी कोणता सिनेमा बॉक्स ऑफिसवर बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पद्मावत सिनेमा सुरुवातीला 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र वाद निर्माण झाल्याने प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले होते. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने इतिहासकारांचा समावेश असलेली समिती स्थापन केली होती. त्यांनी सिनेमामध्ये सुचवलेल्या पाच सुधारणा केल्यानंतर यू/ए प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यानंतर आता 'पद्मावत' या नावाने चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
राजपूत समुदायाच्या आक्षेपानंतर भन्साळी यांचा 150 कोटी रुपयांचा हा सिनेमा वादात सापडला होता. सिनेमाविरुद्ध उग्र निदर्शने करण्यात आली होती. पद्मावत सिनेमा पोस्टर व त्यानंतर ट्रेलर लॉन्चपासून वादाच्या भोवऱ्यात आहे. विविध राजपूत संघटनांनी भन्साळींच्या या भव्य सिनेमाला विरोध करत त्यात सहभागी कलाकारांना धमकावलंसुद्धा आहे. राणी पद्मावती आणि राजपूत संस्कृती मलीन करत हा सिनेमा साकारण्यात आला असल्याचा आरोप अनेकांनी लावला.