राजपूत करणी सेनेच्या नाक कापण्याच्या धमकीनंतर 'पद्मावती'ची अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या घराबाहेर वाढवली सुरक्षा व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 08:05 AM2017-11-17T08:05:41+5:302017-11-17T08:08:51+5:30
संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित आणि प्रदर्शनापूर्वी तितकाच वादग्रस्त ठरलेला 'पद्मावती' या सिनेमामागील वाद कमी होण्याचे नाव घेत नाहीयत.
मुंबई - संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित आणि प्रदर्शनापूर्वी तितकाच वादग्रस्त ठरलेला 'पद्मावती' या सिनेमामागील वाद कमी होण्याचे नाव घेत नाहीयत. या सिनेमाला प्रचंड विरोध होत आहे. यातच पद्मावती सिनेमा प्रदर्शित झाला तर या सिनेमातील अभिनेत्री दीपिका पादुकोणचे नाक कापून टाकू, अशी धमकी राजपूत करणी सेनेने दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी गुरुवारी दीपिका पादुकोणच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.
राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र नाथ यांनी गुरुवारी ( 16 नोव्हेंबर ) लखनऊ येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली. पद्मावती हा सिनेमा हिंदूंच्या भावना दुखावणारा आहे. त्यासाठी भन्साळींना दुबईतून पैसा मिळाला आहे. दाऊद इब्राहीमने त्यांना दुबईमार्गे पैसा पुरवला आहे. पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच, या सिनेमातील अभिनेत्री दीपिका पादुकोणचे नाक कापण्याची जाहीर धमकीदेखील त्यांनी यावेळी दिली.
Security tightened at Deepika Padukone's residence in #Mumbai#Padmavatipic.twitter.com/v0MZeDZ1FU
— ANI (@ANI) November 17, 2017
तर दुसरीकडे, पद्मावती सिनेमा होणारा विरोध पाहता, उत्तर प्रदेशच्या सरकारने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. ''सिनेमात ऐतिहासित तथ्ये चुकीच्या पद्धतीने मांडली गेली आहेत. त्यामुळे शांतता आणि कायदा सुव्यवस्थेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे'', असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.. या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर, मुंबई पोलिसांनी पद्मावती सिनेमा दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे कार्यालय आणि घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे. त्यांच्यासोबत सुरक्षेसाठी सशस्त्र जवान तैनात करण्यात आलेत.
1 डिसेंबर 2017 ला पद्मावती सिनेमा प्रदर्शित होणार आहे. राणी पद्मिनी अर्थात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पादुकोण आणि अभिनेता शाहिद कपूर हा राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच, अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे. तर, या या सिनेमात रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या सिनेमांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.
पद्मावतीला कोणीही रोखू शकणार नाही - दीपिका पादुकोण
सिनेमा प्रदर्शित होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. आम्ही फक्त सेन्सॉर बोर्डाला उत्तर देण्यास बांधिल आहोत, असे अभिनेत्री दीपिका पादुकोणने म्हटले आहे. तसेच, हा सिनेमा 1 डिसेंबरला प्रदर्शित होईल, असा विश्वासदेखील तिने व्यक्त केला आहे.
पद्मावतीला विविध संघटनांचा विरोध
पद्मावती या सिनेमाला सुरुवातीपासूनच विरोध होत आहे. जयपूरमध्ये या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान विरोध झाला होता, तर खुद्द भन्साळींना मारहाणही करण्यात आली होती. महाराणी पद्मावतीवर आधारित या सिनेमाची कथा आहे. राणी पद्मावती तिच्या सौंदर्य, बुद्धी आणि साहसासाठी लोकप्रिय होती. राणी पद्मावती आणि राजामध्ये काही इन्टिमेट सीन्स आहेत, तसेच या सिनेमातून चुकीचा इतिहास मांडला जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे.