लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईसह राज्यभरातील सर्वच शहरांना कमाल तापमानाचे चटके बसत असून, बहुतांशी शहरांचे कमाल तापमान चाळिशी पार गेले आहे. विशेषत: विदर्भात कमाल तापमानाने कहर केला आहे. राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४४ अंश इतके होते. जगभरातील उष्ण शहरांच्या यादील चंद्रपूर सहाव्या क्रमांकावर हाेते. मुंबईचा पारा ३२ अंशांवर पोहोचला आहे.
राज्यात ठिकठिकाणी आलेली उष्णतेची लाट आणखी दोन दिवस कायम राहणार असून, एप्रिल आणि मे महिन्यांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याने उन्हाळ्याचा ताप अधिकच वाढणार आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भात बहुतांश ठिकाणी व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी व कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.
१ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.२ एप्रिल रोजी मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.३ एप्रिल रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.
चंद्रपूर ४४ मालेगाव ४३.४ वर्धा ४३.२ अकोला ४३.१ अहमदनगर ४२.७ अमरावती ४२ नागपूर ४२ यवतमाळ ४२ गोंदिया ४१.८ जळगाव ४१.८ सोलापूर ४१.६ वाशिम ४१.५
नांदेड ४१.४ परभणी ४१.३ बुलडाणा ४०.५ गडचिरोली ४०.२ सांगली ४०.२ सातारा ३९.५ कोल्हापूर ३९.६ औरंगाबाद ३९.३ पुणे ३८.७ नाशिक ३७.३ मुंबई ३२.६