लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेनेच्या ५५व्या वर्धापनदिनानिमित्त वर्सोवा विधानसभेतील शिवसेना शाखा क्रमांक ६० आयोजित रक्तदान शिबिराला पोलीस अधिकाऱ्यांसह इच्छुक रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी १०६ पिशव्या रक्त जमा झाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एक पोलीस इन्स्पेक्टर आणि दोन महिला पोलीस कॉन्स्टेबलांनी यावेळी रक्तदान केले.
स्थानिक शाखाप्रमुख सिद्धेश चाचे व अश्विनी खानविलकर यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. काहींना तर लस घेऊन १४ दिवस झाले नसल्याने रक्तदान करण्याची संधी मिळाली नाही, तरी शाखेने १०६ रक्तदानाचा आकडा पार पाडला.
शिवसैनिकांच्या जिगरबाज मेहनतीला शिवसेना नेते व उत्तर पश्चिम मुंबईचे स्थानिक खासदार गजानन कीर्तिकर यांनी स्वत: उपस्थित राहून दाद दिली. यावेळी विभागातील ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र व नूतन मतदार नोंदणी या सेवांचा प्रारंभ करण्यात आला.
शिबिराला वर्सोवा विधानसभेचे संघटक शैलेश फणसे, समन्वयक बाळा आंबेरकर, उपविभागप्रमुख राजेश शेट्ये, महिला समन्वयक शीतल सावंत, महिला उपविभाग संघटक जागृती भानजी, शाखाप्रमुख सतीश परब, महिला शाखा संघटक बेबी पाटील, मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष नंदू खानविलकर, दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राचे विजय जाधव, युवा सेनेचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
-----------------------------------------------