पेंग्विन घोटाळ्यावरून शेलार-प्रभू खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 05:14 AM2017-07-29T05:14:12+5:302017-07-29T05:14:26+5:30
मुंबईतील जिजामाता उद्यानातील पेंग्विन कंत्राटातील घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील जिजामाता उद्यानातील पेंग्विन कंत्राटातील घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली. तर, त्यांना, ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाऊ द्या, असे आव्हान शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी दिले.
मुंबई तसेच इतर शहरांच्या विकासात येणाºया अडचणी याबाबतची चर्चा उपस्थित करण्यात आली होती. त्यात सहभागी होताना आशिष शेलार बोलत होते. जिजामाता उद्यानात आणण्यात आलेले पेंग्विन पक्षी हे बॅक्टेरियाग्रस्त होते म्हणून त्यातील एका पक्षाचा मृत्यू झाला. या पक्षांची व्यवस्था बघणाºया कंपनीला कोणताही अनुभव नाही. कंपनीच्या एका प्रतिनिधीला महापालिकेने आधीच्या एका प्रकरणात काळ्या यादीत टाकले आहे. कंत्राटात दाखविण्यात आलेल्या जे.व्ही. पार्टनर कंपन्या बोगस आहेत. यामुळे या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.
कोणत्याही प्रकारची चौकशी करा. कर नाही तर डर कशाला?
असे आव्हान देत सुनील प्रभू म्हणाले की, आबालवृद्ध आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पेंग्विन आणण्याचा निर्णय खरोखरच चांगलाच होता. यासाठी देण्यात आलेल्या कंत्राटात काहीही गडबड झालेली नाही आणि पहारेकºयांना (भाजपा) तसे वाटतच असेल तर चौकशी होऊ द्या.
भाजपाचे ज्येष्ठ सदस्य मंगल प्रभात लोढा यांनी सुनियोजित विकास, सुविधांचा विस्तार आणि रोजगार वाढविण्याकरिता मुंबईसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी केली. एमएमआरडीए, सिडको, म्हाडा, एसआरए, महानगरपालिका, एमएसआरडीसी अशा वेगवेगळ्या सरकारचे उपक्रम आहेत, ज्यांचा परस्पर ताळमेळ नसून यामुळे मुंबईच्या विकासाला खीळ बसली आहे. त्यामुळे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. राज्यातील उद्योगांना कर सवलती देण्याची मागणी त्यांनी केली.
आव्हाड यांचा हल्लाबोल
राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी एसआरए घोटाळ्यांवरून माजी सीईओ विश्वास पाटील यांना लक्ष्य केले. एका महिन्यात त्यांनी पाचशे फायली मोकळ्या केल्या. आम्ही ‘पानिपत’चे विश्वासराव पाहिले होते; पण हे विश्वासराव कमालीचे कार्यक्षम अधिकारी निघाले, असा टोला त्यांनी हाणला. कचºयामुळे मुंबईचे वाटोळे झाले आहे. कचºयाच्या भ्रष्टाचाराने मिठी नदीचे प्रदूषण वाढले आहे. आम्ही स्मार्ट सिटी करतोय; पण त्यात शौचालयाला जाण्याची सोय नाही, असे ते म्हणाले.