Join us  

"पहाडी गोरेगाव" मेट्रो स्थानकाचे नाव बदलून झाले "बांगुर नगर"

By मनोहर कुंभेजकर | Published: April 12, 2023 2:19 PM

माजी खासदार संजय निरुपम यांच्या मार्गदर्शनाखाली सुर्यकांत मिश्रा यांनी दोन वेळा आंदोलन करून आठवडाभर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती.

मुंबई- गोरेगाव पश्चिम येथील मेट्रो स्थानकाचे नाव " पहाडी गोरेगाव" ठेवण्यात आले होते त्यावेळी मुंबई  काँग्रेसचे सरचिटणीस सुर्यकांत मिश्रा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एमएमआरडीए आयुक्त यांच्याशी पत्र व्यवहार करून " पहाडी गोरेगाव" ऐवजी " बांगुर नगर" नाव ठेवण्यात यावे, अशी मागणी केली होती. या संदर्भात एमएमआरडीए आयुक्तांची त्यांनी वारंवार भेट घेतली.तर लोकमत मध्ये या संदर्भात दि,10 जानेवारी रोजी वृत्त प्रसिद्ध झाले होते.

माजी खासदार संजय निरुपम यांच्या मार्गदर्शनाखाली सुर्यकांत मिश्रा यांनी दोन वेळा आंदोलन करून आठवडाभर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती. या आंदोलनाला आणि स्वाक्षरी मोहिमेला स्थानिक रहिवाश्यांनी देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. "बांगुर नगर" नावासाठी स्थानिक सुद्धा आग्रही होते. बांगुर नगर नावाने या भागात पोलीस स्टेशन आहे, पोस्ट ऑफिस असून बांगूर नगर नावाने येथे मोठी वसाहत आहे,तरीही मेट्रो स्टेशनला  बांगुर नगर नाव न देता पहाडी गोरेगाव हे नाव दिले होते.याला  विरोध करत यावेळी बांगूर नगर मधील हजारों नागरीकानी स्वाक्षरी मोहिम राबवली होती अशी माहिती त्यांनी दिली.

आज आमच्या लढ्याला यश मिळाली असून गोरेगाव पश्चिम येथील मेट्रो स्थानकाचे नाव 'पहाडी गोरेगाव: बदलून "बांगुर नगर" करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी देखील खूप आनंदी झालेले आहेत याबाबत स्थानिक रहिवाशांतर्फे त्यांनी एमएमआरडीए आयुक्तांचे आभार मानले आहे.

टॅग्स :मेट्रोमुंबई