मुंबई: मुंबई विद्यापीठासमोर असलेल्या निकालाच्या डेडलाइनमुळे, कामात गुंतलेल्या विद्यापीठाला बृहत आराखड्याचा विसर पडला. ३१ जुलै जवळ आल्यावर आराखड्याची डेडलाइन संपत आल्याचा साक्षात्कार विद्यापीठाला झाल्याने, रविवारी सुट्टीच्या दिवशी सिनेटसह अन्य तीन बैठका बोलाविण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या १६०व्या वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सिनेटसह अन्य तीन बैठका होणार आहेत. १६०व्या वर्षात अनेक ऐतिहासिक घटना घडत असल्याने, सर्व स्तरातून टीका होत आहे.मुंबई विद्यापीठाला ३१ जुलैपर्यंत बृहत आराखडा राज्य सरकारकडे पाठवायचा आहे. त्यामुळे रविवारी बृहत आराखड्यावर चर्चा आणि निश्चित करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने बैठक बोलाविली आहे. मात्र, रविवार असल्याने सिनेटच्या सभेला नामनिर्देशित सरकारी सदस्यांनी येण्यास नकार दिला आहे. यामुळे विद्यापीठाची चिंता वाढली आहे. सध्या विद्यापीठात निकाल लावण्याची लगीनघाई सुरू आहे. प्राध्यापकांसह सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग याच कामात गुंतलेला आहे. निकालाच्या कामामुळे प्रशासने अद्याप बृहत आराखडा अद्याप मंजूर केलेला नसल्याने, ऐन रविवारी ३० जुलै रोजी यासाठी विशेष बैठक आयोजित करण्याची वेळ आली आहे.बृहत आखाड्याच्या बैठकीसह मॅनेजमेंट कौन्सिलची बैठक, अकॅडमिक कौन्सिलची बैठक आणि त्यानंतर विशेष सिनेटच्या सभेचे आयोजन करण्याची वेळ आली आहे. विद्यापीठाच्या आतापर्यंतच्या इतिहासात आतापर्यंत कधीही रविवारी सिनेट आयोजित केलेली नाही. त्यामुळे प्रशासन दररोजच्या कामकाज अपयशी ठरत असल्याची टीका होऊ लागली आहे. मुंबई विद्यापीठ निकाल लावण्यास अपयशी ठरले आहे, तसेच आता बृहत आराखडासारखी महत्त्वाची बाब विसरणे म्हणजे खेदाचेच आहे. कधीच रविवारी सिनेटची बैठक घेण्याची वेळ विद्यापीठावर आलेली नव्हती.आता मात्र, ही नामुष्की विद्यापीठावर ओढाविली असून, कुलगुरूंना राजीनामा देण्याशिवाय पर्याय उरलेला नसल्याचे सिनेटच्या माजी सदस्यांचे म्हणणे आहे. कुलगुरू डॉ. संजय देशमुख हा विद्यापीठात नवीन पायंडा घालू पाहात आहेत. त्यामुळे प्रशासनावरची त्यांची पकड ठेवण्यात ते अपयशी ठरत असल्याचे दिसून आले आहेत. विद्यापीठाचा निकाल ही ३१ जुलैपर्यंत जाहीर होतील, असे वाटत नाही. त्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, असेही माजी सिनेट सदस्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता हा निकालाचा गोंधळ सुटण्याचे नाव घेत नसून त्यामुळे मुंबई विद्यापीठावरही सर्वच स्तरातून टीकेला सामोरे जाण्याची नामुष्की ओढावी आहे.शिक्षणमंत्री राज्यपालांना भेटलेमुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालाबाबत माहिती देण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेतली. त्यावेळी विद्यापीठाचे निकाल आणि परीक्षांच्या पेपर तपासणी संदर्भात दोघांमध्ये सुमारे अधार्तास सविस्तर चर्चा झाली. विद्यापीठांच्या परीक्षांच्या सर्व उत्तरपत्रिका दिलेल्या मुदतीत तपासून होतील आणि बहुतांश परीक्षांचे निकाल ३१ जुलैपर्यंत लागतील, अशी माहिती तावडे यांनी राज्यपालांना दिली.पुन्हा एकदा अपयशमुंबई विद्यापीठ निकाल लावण्यास अपयशी ठरले आहे, तसेच आता बृहत आराखड्यासारखी महत्त्वाची बाब विसरणे म्हणजे विद्यापीठाचे आणखी एक अपयशच आहे. कधीच रविवारी सिनेटची बैठक घेण्याची वेळ विद्यापीठावर आलेली नव्हती. आता मात्र ही बैठक रविवारी घ्यावी लागणार असून डेडलाईनसाठीही काम करावे लागेल.
पहिल्यांदाच रविवारी होणार सिनेटची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 1:19 AM