पहलाज निहलानींना अखेर हटवणार?

By admin | Published: March 21, 2015 02:01 AM2015-03-21T02:01:51+5:302015-03-21T02:01:51+5:30

सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पदावरून हटवणे जवळपास नक्की झाले आहे.

Pahlaj will finally remove Nihalani? | पहलाज निहलानींना अखेर हटवणार?

पहलाज निहलानींना अखेर हटवणार?

Next

सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्षपद : चंद्रप्रकाश द्विवेदींचे नाव चर्चेत
मुंबई - सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पदावरून हटवणे जवळपास नक्की झाले आहे. चार दिवसांपूर्वी बॉलीवूडमधील केंद्रीय सूचना प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन राठोड यांच्यासमवेत बॉलीवूडच्या काही निर्माता-दिग्दर्शक-कलाकारांनी एकत्र येत निहलानी यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य होण्याची चिन्हे आहेत. निहलानींना हटवल्यानंतर त्यांच्या जागी डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांची वर्णी लागू शकते. या महिनाअखेरीस पहलाज यांच्या जागी सरकारकडून डॉ. द्विवेदी यांची नियुक्ती केली जाईल, असे मानले जात आहे. जानेवारीत पहलानी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती, तर बोर्डाचे सदस्य म्हणून डॉ. द्विवेदी यांची नियुक्ती झाली होती.
चार दिवसांपूर्वी केंद्रीय सूचना प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन राठोड यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत पहलाज निहलानींना पदावरून हटवण्याची मागणी करणाऱ्यांमध्ये चंद्रप्रकाश द्विवेदी यांचे नाव आघाडीवर होते. त्याचबरोबर मुकेश भट्ट, अनुष्का शर्मा यांनी ठोस कारणे देत अध्यक्षांविरोधात आवाज उठवला होता. या बैठकीत राठोड यांनी निहलानींना हटवण्याचे संकेत दिले होते. तसेच बोर्डाच्या समस्या सोडवण्यासाठी गंभीरपणे पावले उचलू, असेही सांगितले होते. चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांबरोबर झालेल्या बैठकीनंतर राठोड यांनी दुसऱ्याच दिवशी सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत अनौपचारिक बैठक घेतली. त्या वेळी पहलाज यांच्या कार्यशैलीवर चर्चा झाली. त्या वेळी अनेक जण पहलाज यांच्या विरोघात होते, असे सूत्रांनी सांगितले. पहलाज यांच्या जागी डॉ. द्विवेदी यांच्याबरोबरीनेच गुलजार, फिल्मकार अशोक पंडित, हेमा मालिनी यांची नावेही चर्चेत आहेत. याआधी बोर्डाचे अध्यक्षपद सांभाळणाऱ्या अनुपम खेर यांचेही नाव चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र द्विवेदी यांच्याखेरीज इतरांनी काही कारणे देत हे पद सांभाळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सध्यातरी बोर्डाच्या अध्यक्षपदाचे दावेदार म्हणून डॉ. द्विवेदी यांच्या नावाची चर्चा अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले. वैचारिकदृष्ट्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे मानले जाणारे डॉ. द्विवेदी हे लालकृष्ण अडवणींच्या जवळचे आहेत. छोट्या पडद्यावर ‘चाणक्य’ या मालिकेत त्यांनी प्रमुख भूमिका केली होती. सनी देओलबरोबरचा त्यांचा ‘अस्सी मोहल्ला’ हा चित्रपट सध्या वादात अडकला आहे. (प्रतिनिधी)

‘झेड प्लस’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी जेव्हा डॉ. द्विवेदी ‘लोकमत’ कार्यालयात आले होते, त्या वेळी त्यांनी बोर्डाशी संबंधित समस्यांवर मोकळेपणे चर्चा केली होती. सरकारने त्यांना बोर्डाचे अध्यक्षपद दिल्यावर ते ही जबाबदारी घेण्यास तयार आहेत का, या प्रश्नावर त्यांनी देश आणि इंडस्ट्रीच्या हितासाठी कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास आपण तयार असल्याचे सांगितले आहे.

Web Title: Pahlaj will finally remove Nihalani?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.