सरकारची वर्षपूर्ती विरोधकांचे हेच दुखणे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 06:12 AM2020-11-28T06:12:50+5:302020-11-28T06:14:03+5:30
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
अतुल कुलकर्णी
मुंबई : पाच वर्ष भाजप सत्तेवर असताना त्यांचे आपापसात प्रचंड वाद होते. एका व्यक्तीच्या अहंकारामुळे भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना पक्ष सोडावा लागला किंवा घरी बसावे लागले. त्यामुळे आमच्यात वाद आहेत, असे भाजपला बोलण्याचा अधिकार नाही. आम्ही तीन पक्ष मिळून सरकार उत्तमपणे चालवत आहोत. मंत्र्यांनी आपल्या विभागाला जादा निधी मिळावा म्हणून आग्रही असणे म्हणजे आमच्यात वाद आहेत, असा अर्थ होत नाही. आघाडी सरकारने निर्विवादपणे एक वर्ष पूर्ण केले हेच विरोधकांचे दुखणे आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
तुम्ही भिन्न विचाराच्या पक्षासोबत जाऊन काय मिळवले?
विभाजनवादी, दहशतीची आणि भेद निर्माण करणारी राजकीय पद्धत रूढ करू पाहणाऱ्या भाजपला आम्ही वर्षभर सत्तेपासून दूर ठेवू शकलो. काँग्रेस आज अडचणीत असेलही आणि सर्व क्षेत्रात लगेच समानता येणे कठीण असले तरी, काँग्रेसचा सर्वांना समान न्याय मिळवून देण्याचा विचार शाश्वत आहे. सर्वांना पुढे नेणारा तो विचार आहे. आम्ही किमान समान कार्यक्रमावर एकत्र आलो. राज्यघटनेचे मूळ तत्त्व पाळण्यासाठी एकत्र आलो. आम्ही जर हे केले नसते तर, भाजपने राज्यातही विभाजनवादी आणि दहशत, भेद निर्माण करणारे राजकारण केले असते.
एक वर्षातील सरकारची उपलब्धी
म्हणून तुम्ही काय सांगाल?
कोरोनामुळे वर्ष गेले. त्याचे संकट आजही कायम आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी ओला दुष्काळ तर काही ठिकाणी महापूर आला. नैसर्गिक संकटांचे हे वर्ष होते. अशा परिस्थितीतही आम्ही स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत दिली. त्यामुळे जनतेचा फायदा झाला, सरकारलादेखील निधी मिळाला. १ सप्टेंबर ते २५ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत आम्ही ५ लाख १९ हजार ३७३ दस्तांची नोंदणी केली, त्यापोटी ६,५४२ कोटी ७० लाख रुपये राज्याला उत्पन्न मिळाले. याच काळात यावर्षी आम्ही तब्बल लाख २२ हजार ३४८ दस्तांची नोंदणी केली व ५,११२ कोटी ७७ लाखांचे उत्पन्न मिळवले. याचा सरळ अर्थ जवळपास २ लाख लोकांना या योजनेचा फायदा झाला. सरकारलाही उत्पन्न मिळाले. हा या वर्षातील सगळ्यात महत्त्वाचा निर्णय ठरला, असे मी म्हणेन.
शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही
असा आरोप आहे, त्याबद्दल काय ?
विरोधकांना आरोप करण्याशिवाय काम उरलेले नाही. आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला. दोन लाखांपर्यंतचे पैसे विनासायास शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. चक्रीवादळामुळे झालेले पिकांचे नुकसान, पूर्व विदर्भातील महापूर या सगळ्या परिस्थितीवर दहा हजार कोटींचे पॅकेज दिले. शहरांसाठी कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग ही कामे आम्ही बंद ठेवली नाहीत. परिणामी लोकांना काम मिळू लागले. लोकांच्या हातात पैसा आला, तो बाजारात आला आणि कठीण काळ असतानाही सरकार कुठेही कमी पडलेले नाही.
काँग्रेसचे मंत्री निधी वाटपाबाबत नाराज का?
उत्पन्नाचे मार्ग कमी झाल्यामुळे आणि केंद्र सरकारने राज्याच्या हक्काचे जवळपास अडतीस हजार कोटी रुपये न दिल्यामुळे राज्य आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे प्रत्येक मंत्री आपल्या विभागाला निधी मिळावा म्हणून आग्रही राहात असेल तर त्यात चुकीचे ते काय? प्रत्येकाने आपल्या विभागासाठी आग्रही राहायला हवे. त्यावरून आमच्यात विसंवाद आहे, असा अर्थ काढणे चुकीचा आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांना डावलले जात आहे का?
विधानसभेचे अध्यक्षपद जर पृथ्वीराज चव्हाण स्वीकारणार असतील, तर त्याला आमची तयारी आहे, असे राष्ट्रवादीने स्पष्ट केले होते. याबाबतची एक बैठक पृथ्वीराज चव्हाण यांच्यात मुंबईतील कार्यालयात आम्ही सगळ्या नेत्यांनी घेतली होती. मात्र त्यांनीच हे पद घेण्यास नकार दिला. त्यामुळे या चर्चेला अर्थ नाही. आजही अनेक महत्त्वाचे निर्णय आम्ही त्यांच्याशी चर्चा करूनच घेतो. मी किंवा अशोक चव्हाण; आम्ही दोघेही सतत त्यांच्या संपर्कात असतो.
आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला. दोन लाखांपर्यंतचे पैसे विनासायास शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. चक्रीवादळामुळे पिकांचे नुकसान, पूर्व विदर्भातील महापूर या परिस्थितीवर दहा हजार कोटींचे पॅकेज दिले. .
- बाळासाहेब थोरात,
महसूल मंत्री