Join us

मुसळधार पावसाने वाढविले खड्ड्यांचे दुखणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 4:07 AM

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन यामुळे गेल्यावर्षी मुंबईतील खड्ड्यांच्या तक्रारीत घट दिसून आली होती. मात्र दोन आठवड्यांपासून मुंबईला ...

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन यामुळे गेल्यावर्षी मुंबईतील खड्ड्यांच्या तक्रारीत घट दिसून आली होती. मात्र दोन आठवड्यांपासून मुंबईला झोडपणाऱ्या पावसाने खड्ड्यांचे दुखणे पुन्हा एकदा बळावले आहे. आतापर्यंत सुमारे ४७१ तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यामध्ये ४० टक्के वाढ दिसून आली आहे. यापैकी ३४३ खड्डे बुजविल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला आहे. मात्र दरवर्षी मुंबईत मुसळधार पावसानंतर रस्त्यांची चाळण होत आहे. यावर्षीचा पावसाळाही त्यास अपवाद नाही. सन २०२० मध्ये पावसाळ्यातील सुरुवातीच्या दोन महिन्यांत खड्ड्यांबाबत ३१५ तक्रारी आल्या होत्या. मात्र यावर्षी २७ जुलै रात्री आठ वाजेपर्यंत ५९६ तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत. यामध्ये पालिकाव्यतिरिक्त अन्य प्राधिकरणांच्या अखत्यारितील रस्त्यांचाही समावेश आहे.

महापालिकेचे ॲप, सोशल मीडिया व ई-मेलद्वारे खड्ड्यांबाबत नागरिक तक्रार करू शकतात. कोणत्याही विभागातील खड्ड्यांबाबत तक्रार आल्यानंतर ४८ तासांच्या कालावधीत तो खड्डा बुजविण्याची ताकीद अभियंत्यांना दिली जाते. मागील दोन आठवड्यांपासून मुंबईत सतत मुसळधार पाऊस कोसळत आहेेे. त्यामुळे अनेक विभागांमधील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने पादचारी आणि वाहनचालकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

खड्ड्यांच्या तक्रारी

मध्यवर्ती..

तक्रारी आल्या...४१

बुजविण्याचे नियोजन....३७

प्रक्रिया सुरू ...३७

विभागस्तरावरील तक्रारी

तक्रारी आल्या...४७१

बुजविण्याचे नियोजन....४०७

प्रक्रिया सुरू ...३६७

बुजविले ...३४३

अन्य प्राधिकरण

तक्रारी आल्या...३०

बुजविण्याचे नियोजन....एक

प्रक्रिया सुरू ...एक

----------------

* गेल्यावर्षी जून - जुलै महिन्यात ३१५ खड्ड्यांच्या तक्रारी आल्या होत्या, तर यावर्षी याच कालावधीत विभागस्तरावर ४७१ तक्रारी आल्या आहेत. मुंबईत २०५५ किलोमीटर रस्त्याचे जाळे आहे.

* खड्डे बुजवण्यासाठी प्रत्येक विभागस्तरावर दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी मोठे खड्डे बुजवण्यासाठी दीड कोटी तर छोटे खड्डे बुजवण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

* मालाड, अंधेरी पश्चिम, कुर्ला, चेंबूर आणि भांडुप या विभागांतील खड्ड्यांच्या तक्रारी अधिक आहेत.