मुंबई : गुडघेदुखीचा त्रास असलेल्या एका ५५ वर्षीय महिलेचा गुडघा ब्लेडने चिरून अघोरी उपचार करत त्यांची ८ लाख २५ हजार रूपयांची फसवणूक करण्याचा प्रकार अंधेरीच्या जे.बी.नगर येथे घडला. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी फिरोज मर्चंट, कैलासकुमार मंडल, आणि सुमंत कुमार झा या भामट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार या अंधेरी पूर्वमधील जे.बी.नगर परिसरात पतीसोबत राहतात. त्यांचा डाव्या पायाचा गुडघा दुखत असल्याने सात वर्षांपूर्वी ताडदेवच्या जसलोक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर काहीकाळ त्यांना बरे वाटले. मात्र २०२१ मध्ये त्यांच्या गुडघादुखीने पुन्हा डोके वर काढले.
यादरम्यान गेल्यावर्षी दि. १७ सप्टेंबर रोजी विलेपार्ले येथे पतीसोबत खरेदीसाठी गेल्या असताना एका व्यक्तीने त्यांना थांबविले आणि स्वत:चे नाव विजय मेहता असल्याचे सांगत, तुमच्यासारखाच माझ्या आईलादेखील गुडघेदुखीचा त्रास होता, तेव्हा ठाण्यातील फिरोज मर्चंट नावाच्या डॉक्टरने तिला विनाशस्त्रक्रिया ठीक केले, अशी माहिती दिली. ते ऐकून तक्रारदाराच्या पतीने २५ सप्टेंबर रोजी मर्चंट याला संपर्क करत विजयचा रेफरन्स देऊन अपॉइंटमेंट मागितली. त्यावर मर्चंट याने अंधेरी एमआयडीसी परिसरात एका रुग्णाला तपासण्यासाठी येणार असून, त्यावेळी तुमच्या घरी येऊन जाईन, असे सांगितले. त्यानुसार दुसऱ्या दिवशी त्याने त्याच्या सहकाऱ्यासह तक्रारदाराच्या घरी जाऊन गुडघा ब्लेडने चिरून अघोरी उपचार केले.
हे उपचार करताना फिरोजने हळद आणि पाण्याचा मग मागविला. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या दोन्ही पायांच्या गुडघ्यांना ब्लेडने थोडे कापत तिथे एक लहान पाइप लावला. त्या पाइपमधून तोंडाने ओढून पिवळ्या रंगाचा द्रव बाहेर काढत तो पाण्याच्या मगमध्ये थुंकू लागला. त्याचे मोजमाप असिस्टंटला करायला सांगत तुमच्या गुडघ्यामध्ये बरेच पित्त जमले असून, रक्त येईपर्यंत ते काढावे लागेल, असे मर्चंटने तक्रारदाराला सांगितले.
त्याने जवळपास २०० वेळा हा प्रकार केला. त्यानंतर तोंडाने काढलेल्या प्रत्येक द्रवाचे ४ हजार असे एकूण ८ लाख बिल झाल्याचे त्याने सांगितले. त्यावेळी तक्रारदाराने पैसे कमी करायला सांगितल्यावर आधी ॲडव्हान्स म्हणून १० हजार रुपये आणि नंतर चेकने ६.१५ लाख रुपये मंडलच्या खात्यावर जमा करून घेतले. त्यानंतर पुन्हा एका आठवड्याने त्यांच्या घरी जात त्यांचे पाय तपासून आता पायामध्ये पित्त नसून तपासण्याचे २ लाख रुपये मागितले. ती रक्कम तक्रारदाराच्या पतीने झा याच्या खात्यावर चेकमार्फत जमा केली.
असे क्लिनिकच नाही...
तक्रारदार गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये काही दिवसांसाठी ओडिसाला गेल्या होत्या. तिथून परतल्यानंतर त्यांचे पाय पुन्हा दुखू लागल्याने त्यांनी मर्चंट याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कधी मी बाहेर आहे, कधी आई वारली, तर कधी माझा अपघात झाला, अशी तो कारणे देऊ लागला. संशय आल्याने तक्रारदाराचे पती नोव्हेंबरमध्ये विजयने दिलेल्या फिरोजच्या ठाण्यातील क्लिनिकच्या पत्त्यावर गेले. तेव्हा गेल्या तीन वर्षांत असे कोणतेच क्लिनिक या ठिकाणी उघडलेले नसून लोकांकडून पैसे घेतल्याने आतापर्यंत ३० ते ४० लोक या डॉक्टरबाबत विचारणा करायला येथे आले होते, असे कळाले.