पोर्ट्रेट जत्रेत रंगले कलाकार!
By admin | Published: January 3, 2015 02:03 AM2015-01-03T02:03:44+5:302015-01-03T02:03:44+5:30
जे.जे़ स्कूल आॅफ आर्टच्या आवारात रंगलेल्या दोन दिवसीय पोर्ट्रेट जत्रेत दिग्गज कलाकारांनी नवोदितांना ‘पोर्ट्रेट’चे महत्त्व सांगितले.
मुंबई : जे.जे़ स्कूल आॅफ आर्टच्या आवारात रंगलेल्या दोन दिवसीय पोर्ट्रेट जत्रेत दिग्गज कलाकारांनी नवोदितांना ‘पोर्ट्रेट’चे महत्त्व सांगितले. या जत्रेच्या दुसऱ्या दिवशी पोर्ट्रेट चितारण्याची महास्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेची पारितोषिके जवाहरलाल दर्डा फाउंडेशनने प्रायोजित केली होती. ‘लोकमत’च्या सहकार्याने झालेल्या या अनोख्या स्पर्धेने कलाविश्वात चांगलाच लौकिक मिळवला.
पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुपच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पोर्ट्रेट जत्रेच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत, सुहास बहुळकर आणि अनिल नाईक या दिग्गज कलाकारांनी एकमेकांचे पोर्ट्रेट्स साकारले. मुळात पोर्ट्रेट साकारताना मॉडेल कायम स्थिर असते, मात्र याप्रसंगी एकाच वेळी या तिन्ही मातब्बरांनी एकमेकांचे पोर्ट्रेट्स कॅनव्हासवर रेखाटले. वासुदेव कामत यांनी क्रेआॅन माध्यमातून अनिल नाईक आणि सुहास बहुळकर यांचे चित्र साकारले. अनिल नाईक यांनी अॅकॅ्रलिकच्या माध्यमातून सुहास बहुळकर आणि वासुदेव कामत यांचे चित्र साकारले; आणि सुहास बहुळकर यांनी वासुदेव कामत आणि अनिल नाईक यांचे पोस्टर्स कलर्सच्या माध्यमातून चित्र साकारले.
पोर्ट्रेट्सला सन्मानाचे स्थान मिळवून देण्याच्या मुख्य उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चित्रकार वासुदेव कामत यांनी फेसबुक पेजवर पोर्ट्रेट्सची आॅनलाइन स्पर्धा घेतली होती़ या स्पर्धेतून निवडलेल्या १२ कलाकारांमध्ये पोर्ट्रेट जत्रेदरम्यान स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेत मनोजकुमार सकळे या कलाकाराने प्रथम पारितोषिक पटकावले, तर प्रमोद कुवळेकर याने द्वितीय आणि नानासाहेब येवले याने तृतीय पारितोषिक पटकावले.
आॅनलाइन स्पर्धेतील नऊ स्पर्धकांनाही प्रमाणपत्र आणि पारितोषिकांनी गौरवण्यात आले. (प्रतिनिधी)