- टीम लोकमत, ठाणे
पर्यावरणाबद्दल जागरूक असलेल्या ठाणे, डोंबिवली, कल्याण-बदलापूर या शहरांसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात गुरुवारी पाण्याचा अपव्यय टाळत कोरडी धूळवड साजरी झाली. पाणी वाचवण्याचा संदेश देत, नैसर्गिक रंगांची उधळण करत ठाणे जिल्हावासी रंगले, पण भिजले नाहीत! राज्यातील दुष्काळ आणि ठाणे जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पाण्याचा अपव्यय टाळला.इतर सण-उत्सवांप्रमाणेच ठाणेकरांनी सामाजिक भान राखत होळी आणि धूलिवंदनाचा सण साजरा केला. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात बुधवारी चार हजार ६१६, तर शहरात ९५३ मोठ्या होलिकांचे दहन करण्यात आले. श्रीरंग सोसायटी, कळव्यातील मनीषानगर, नारळवाला चाळीत पर्यावरणस्नेही होळीचे दहन झाले. ब्रह्मांड सोसायटी, पर्यावरण दक्षता मंचाने टाकाऊ वस्तूंची होळी केली. ठाण्यातील बुधवारचे शटडाऊन, कल्याण-डोंबिवली परिसरातील गुरुवारची पाणीकपात यामुळे धूलिवंदनाचा उत्साह सर्वत्र होता. पण, यंदाची भीषण पाणीटंचाई आणि ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनानंतर ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ-बदलापूरसह प्रमुख शहरांत पाण्याविषयी सजगता दिसत होती. सध्याच्या टंचाईच्या काळात घरी साठवून ठेवलेले पाणी घरातील गरजांसाठीच, कामांसाठीच अपुरे पडत असल्यामुळे अनेकांनी पाण्याचा वापर टाळला. कोरड्या रंगांचा वापरही कमी प्रमाणात केला जात होता. अंघोळीलाही पुरेसे पाणी नाही, त्यामुळे रंग थोडाच लावा. नंतर, तो धुवायचा आहे, असे सल्ले एकमेकांना दिले जात होते. काही मोजक्या वस्त्या वगळता पाण्याचा फुग्यांचा वापर यंदा कमी झाला. लहान मुले वगळता पिचकाऱ्यांच्या वापरावरही मर्यादा आल्याचे दिसून आले. अनेक सोसायट्यांनीही पाणी वापरावर निर्बंध आणले. त्यासाठी जागृती केली. त्यासाठी पुढाकार घेतला. होते. धूळवडही अगदी दुपारपर्यंत साजरी न करता सकाळी मर्यादित वेळेतच त्याचा आनंद लुटल्याचे दिसून आले. दुपारनंतर आपापल्या ग्रुपसोबत बाहेर फिरायला जाऊन टपरी, धाब्यांवर, हॉटेलांत जेवणाचा आनंद मात्र अनेकांनी लुटला. मिठाईचे वाटप झाले. काही ठिकाणी संगीताच्या तालावर नृत्ये झाली. स्पर्धा घेण्यात आल्या. होली है / पान ७सामाजिक उपक्रमांची आनंदाला जोड- होळीनिमित्ताने ठाण्यातील सामाजिक संस्थांनी विविध उपक्रम राबविले. त्या माध्यमातून पाणीबचतीचे संदेशही दिले. जिज्ञासा ट्रस्टतर्फे आणि कलास्पर्शच्या सहकार्याने रंगांशी करू मस्ती, कुंचल्याशी करू दोस्ती, हा कार्यक्रम रंगला. या वेळी प्रसिद्ध चित्रकार विजयराज बोधनकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी कॅनव्हासवर रंगांची पखरण करण्याचा आनंद लुटला. अभिनय कट्ट्यातर्फे रोटरी क्लबच्या रोटरीज गॉड गिफ्ट या शाळेतील विशेष मुलांसोबत नैसर्गिक रंगाची उधळण करून पाणीबचतीचा संदेश देण्यात आला. मैत्री फाउंडेशनतर्फे येऊर येथील विवेकानंद बालकाश्रमात अनाथ मुलांसोबत पाणीविरहीत धूळवड साजरी केली गेली. फन स्कूलमधील विद्यार्थ्यांनी पाणी वाचवा आणि इको-फ्रेण्डली होळी या विषयावर चित्रे काढली. बॅनर तयार करून मिरवणूक काढली. अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी शहरात दिवसभर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.होळीच्या पूर्वसंध्येला डोंबिवलीतील मनसेच्या माजी नगरसेविका मंदा पाटील यांनी जलदिंडी काढली. यंदाच्या वर्षी भागशाळा मैदानात मुले, तरुण-तरुणी कोरडी धूळवड साजरी करताना दिसून आली. तुलसी राई विहार, जयहिंद कॉलनी, देशमुख होम्स आदी सोसायट्यांनी पाण्याविना धूळवड साजरी करण्याचा मानस प्रत्यक्षात उतरवला.