मुंबई - चित्रकार-शिल्पकार ओम स्वामी एका हृदयस्पर्शी उपक्रमाद्वारे दृष्टीहिन मुलींना मूर्ती घडवण्यासोबतच चित्रकलेचेही धडे देण्यासाठी सज्ज झाले आहेत. आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो या भावनेतून स्वामी 'आराध्या - दि डेइटी' या त्यांच्या आगामी प्रदर्शनातून या लहान मुलींना गणेश मूर्ती घडवण्यासोबतच चित्र काढायलाही शिकवणार आहेत. त्यामुळे चित्रकला आणि शिल्पकलेद्वारे या मुलींसाठी भविष्यात रोजगाराच्या निर्माण होऊ शकतील.
स्वयंशिक्षित कलाकार ओम स्वामी यांच्या आगामी प्रदर्शनात १९ आकर्षक पेंटिंग्जचे आणि १५ मनमोहक शिल्पांच्या संग्रहाचे अनावरण केले जाईल. ही सर्व चित्रे आणि शिल्पे भगवान गणेश या संकल्पनेवर आधारित आहेत. हे प्रदर्शन वरळीच्या एट्रिया मॉलमधील वाची आर्ट गॅलरी येथे ४ नोव्हेंबर रोजी सुरू होणार असून, १३ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर १४ ते २० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत जहांगीर आर्ट गॅलरीतसुद्धा हे प्रदर्शन भरणार आहे.
स्वामी यांना बालपणापासून गणेशाच्या कलाकृतींबद्दल आकर्षण आहे. लहानपणी ते स्वतः शिल्पकारांना बराच वेळ गणेशमूर्ती घडवताना पाहायचे. या बालपणीच्या आठवणींनी त्यांच्या कलात्मक प्रवासावर अविस्मरणीय ठसा उमटवला आहे आणि अगदी पहिल्यापासून पाहिलेले दैवत 'गणेश' ही त्यांच्या कलेची मध्यवर्ती संकल्पना बनली आहे. याबाबत ते म्हणाले की, माझ्या सर्व कामांमध्ये मी कधीही गणेशाचे डोळे टिपले नाहीत किंवा चित्रित केले नाहीत. गणेशाचे एकंदर रूप स्वतःच इतके सुंदर आहे की माझ्या हातून राहिलेला घटक प्रथमतः कोणाच्याही लक्षात आला नाही. त्यात मी असा विचार केला की जर गणेशाची चित्रे ही डोळ्यांशिवाय सुद्धा विलोभनीय दिसत आहेत, तसेच या लहान मुली दृष्टी नसूनही विलॊभनीयच आहेत. माझा विश्वास आहे की त्यांच्यासाठी, दृष्टी नसणे हा अडथळा नसून एक अनोखा दृष्टीकोन आहे, तसेच त्या ज्या सहजतेने आव्हानांना सामोऱ्या जातात, त्या सहजतेचा हा उत्सव आहे. त्याचा गौरव या उपक्रमातून करण्याचा उद्देश असल्याचेही स्वामी म्हणाले.