मुंबई- शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं आज मुंबईतील विधानभवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. हे चित्र चित्रकार चंद्रकला कदम यांनी साकारलेलं आहे.
विशेष म्हणजे आज बाळासाहेब ठाकरे यांची ९७वी जयंती असून तैलचित्र अनावरण सोहळ्याला अनेक राजकीय मंडळी उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाचे आमंत्रण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांचे कुटुंबिय आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांना देखील देण्यात आले आहे. त्यामुळे आज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार असल्याची चर्चा रंगली आहे.
माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मात्र बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणाच्या कार्यक्रमावर टीका केली आहे. 'या गद्दारांच्या हस्ते माझ्या तैलचित्रांचं अनावरण झालं असं माझं आजोबा म्हणतील,' असा टोला आदित्य ठाकरेंनी हाणला. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझ्या आजोबांच्या तैलचित्रांचं अनावरण होणार असल्याचं म्हणत आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे.
दरम्यान, सदर कार्यक्रमाबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, या कार्यक्रमासाठी राज्यातील केंद्रात असणारे मंत्री, राज्याचे मंत्री, आमदार, खासदार यांना आमंत्रण दिले आहे. त्याचसोबत बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलेले कला, क्रिडा क्षेत्रातील मान्यवर हजर असतील. ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्यांना आमंत्रण दिले आहे. मी स्वत: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि इतर सदस्यांशी बोललो आहे. हा कार्यक्रम विधिमंडळाकडून हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आमंत्रित सर्वांनी उपस्थित राहून बाळासाहेब ठाकरेंना विधिमंडळातर्फे मानवंदना राहावी असं आवाहन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले.
हा विधिमंडळाचा कार्यक्रम- राहुल नार्वेकर
हा विधिमंडळाचा कार्यक्रम आहे. राज्यातील २८८ विधानसभा आमदार, ७८ विधान परिषदेचे आमदार यांच्यावतीने हा कार्यक्रम होतोय. याचा अर्थ अखंड महाराष्ट्राकडून होणाऱ्या या कार्यक्रमावर राजकीय आरोप करून कुठेतरी या कार्यक्रमाची उंची कमी करताय हे करणे योग्य नाही. आपण सर्वांनी एकत्र येऊन बाळासाहेबांना मानवंदना देऊया असंही ते म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"