Join us

फुटपाथला लाल, पिवळा रंग दिला म्हणजे स्मार्टसिटी नाही महापौरांचा अधिकाऱ्यांवर हल्लाबोल, स्मार्टसिटीच्या बैठकीत केली अधिकाऱ्यांची कान उघाडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 5:08 PM

मागील दोन ते तीन वर्षानंतर स्मार्टसिटीची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत सल्लागार समितीमधील सदस्यांनी विविध प्रकल्पांवर आक्षेप घेतले. तर महापौर नरेश म्हस्के यांनी देखील पालिका प्रशासनातील अधिकाºयांची कान उघाडणी करीत केवळ कागदावर चांगले दिसत असलेले प्रकल्प प्रत्यक्षात अयोग्य का? असा सवाल उपस्थित करीत प्रशासनावर हल्लाबोल केला.

ठाणे : स्मार्टसिटीच्या माध्यमातून अनेक प्रकल्प ठाणे शहरात सुरु आहेत. त्यानुसार विविध प्रकल्पांसाठी सल्लागार समिती नेमली जाते. परंतु प्रत्यक्षात प्रकल्प उभारतांना या समितीमधील सदस्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे. एकूणच स्मार्टसिटीच्या माध्यमातून सुरु असलेल्या आणि दिखाऊ प्रकल्पांच्या बाबतीतही त्यांनी हल्ला बोल करीत लाल, पिवळा रंग फुटपाथला देणे म्हणजे स्मार्टसिटी नव्हे अशा शब्दात अधिकाºयांची कान उघाडणी केली.             कोरोनामुळे किंबहुना ठाण्यात स्मार्टसिटीचे कामकाज सुरु झाल्यानंतर आता या समितीच्या दुसरी आणि तिसरी बैठक एकत्रित घेण्यात आली. या बैठकीला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, भाजपचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील, सुलक्षणा महाजन, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख आदींसह स्मार्टसिटीच्या विविध प्रकल्पांचे सल्लागार व पदाधिकारी उपस्थित होते. मागील कित्येक वर्ष स्मार्टसिटीच्या माध्यमातून विविध प्रकल्पांचे कामे शहरात सुरु आहेत. सल्लगार समिती जेव्हा आपण नमतो, तेव्हा सल्लागार समितीचे अध्यक्ष असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांना प्रकल्प उभारतांना या सल्लागार समिती मधील सदस्यांना विश्वासात घेणे गरजेचे होते. प्रकल्प उभारतांना त्यांची मते जाणून घेणे गरजेचे होते, त्यांना प्रकल्पाबाबत काय वाटते, त्यात काही बदल गरजेचे आहेत का?, परंतु त्यांना न विचारता केवळ त्यांना गृहीत धरुन कामे केली जात असून ते चुकीचे असल्याचेही यावेळी महापौर म्हस्के यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लाल पिवळा रंग फुटपाथला दिला म्हणजे स्मार्ट सिटी होत नसल्याचे सांगत त्यांनी अधिकाºयांची चांगलीच कान उघाडणी केली. स्मार्टसिटीमध्ये प्रत्यक्षात कामे होणे गरजेचे आहे, सौर उर्जेचा प्रकल्प उभारण्यात आला, त्याचा पालिकेला काय फायदा झाला, कितीची बचत झाली, याचा कधी आपण विचार केला आहे का? असा सवालही त्यांनी केला. कंमाड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटरमध्ये जी उद्दीष्ट होती, ती संबधींताने पूर्ण केली का?, त्याचा अभ्यास झाला का?, फ्री वायफाय सुरु आहे का?, पाण्याचे मीटर लावले, ते चांगले आहेत का?, त्याची निगा देखभाल कोण करणार, त्यावर कंट्रोल कोणाचे आहे?, याची माहिती घेतली गेली का? असे अनेक सवाल उपस्थित करीत स्मार्टसिटीच्या प्रकल्पांची चिरफाड यावेळी सल्लागार समितीमधील सदस्यांनी केली. एकूणच आपण विविध प्रकल्प हाती घेतो त्यावेळेस कागदावर ते झकास दिसतात. मात्र प्रत्यक्षात त्या प्रकल्पांची तशी अंमलबजावणी होते का?, याचा अभ्यास होत नसून अधिकारी काम करुन निघून जातात आणि त्याचा दोष लोकप्रतिनिधींना लावला जातो असेही यावेळी महापौरांनी सांगितले. तर ज्या कामांना गरज नसतांनाही सल्लागार नेमणे बंद करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. अशा चुकीच्या पध्दतीने स्मार्टसिटीची कामे सुरु असल्याने त्यावर पालिकेच्या अधिकाºयांचा कंट्रोल नसल्याची टिकाही यावेळी महापौरांनी केली.गरजेचे नसलेले प्रकल्प बंद कराकोरोनामुळे पालिकेची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यात स्मार्टसिटीत असे अनेक प्रकल्प आहेत, ज्यांचा सध्या ठाणे शहराला गरज नाही. असे प्रकल्प थांबवून त्या कामाचा निधी महापालिकेचे रस्ते, पाण्याच्या टाकी, पाणी योजना अशा विविध प्रकल्पांसाठी स्मार्टसिटीचा निधी देण्यात यावा असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :ठाणेठाणे महापालिकास्मार्ट सिटी