राणीबागेत येणार इस्रायल झेब्राची जोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:07 AM2021-09-21T04:07:19+5:302021-09-21T04:07:19+5:30
मुंबई - भायखळा येथील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आणखी काही नवीन पाहुणे येणार आहेत. यापैकी इंदूर आणि जुनागड ...
मुंबई - भायखळा येथील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आणखी काही नवीन पाहुणे येणार आहेत. यापैकी इंदूर आणि जुनागड येथून आणण्यात आलेल्या सिंहाच्या बदल्यात इस्रायल येथून झेब्राची जोडी मुंबईत आणण्यात येणार आहे. तत्पूर्वी, यासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणकडून परवानगी मागण्यात आली आहे.
मुंबईतील प्रसिद्ध राणीच्या बागेत नवनवीन देशी-विदेशी प्राणी व पक्षी आणण्यात येत आहेत. फेब्रुवारी २०१९ मध्ये शक्ती आणि करिष्मा ही वाघाची जोडी आणण्यात आली होती. त्याबदल्यात औरंगाबाद येथील प्राणिसंग्रहालयला हरणाची जोडी देण्यात आली होती. मात्र मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर प्राणिसंग्रहालय बंद ठेवण्यात आले.
मात्र या काळात आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना मुंबईत आणण्याचे प्रयत्न राणीबाग व्यवस्थापनाने सुरू ठेवले आहेत. याअंतर्गत इस्रायल येथील प्राणिसंग्रहालयातील झेब्राची जोडी मुंबईत आणण्यात येणार आहे. यासाठी वर्षभरापूर्वीच सल्लागार नियुक्त करून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. राणीबागेत झेब्रा नसल्याने आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातून ही जोडी आयात करण्यात येणार आहे.