Join us  

Pakistan Election : 'कप्तान' इम्रान खानला सल्ला देतानाही शिवसेनेचा नरेंद्र मोदींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 12:03 PM

Pakistan Election : 'अच्छे दिन'चे हाडूक कसे गळ्यात अडकते हे इम्रानला सत्तेच्या काटेरी खुर्चीवर बसल्यावरच कळेल, अशा शब्दांत शिवसेनेनं पाकिस्तानचे नवे 'कप्तान' इम्रान खान यांची शाळा घेतली आहे.

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अगदी रोज टीका करणाऱ्या शिवसेनेनं आज पाकिस्तान निवडणुकीवर लिहिलेल्या अग्रलेखातही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पाकिस्तानी जनतेला नव्या पाकिस्तानचे म्हणजेच एका अर्थाने पाकिस्तानच्या आयुष्यात  'अच्छे दिन' आणण्याचे स्वप्न दाखवून इम्रान खान यांनी या निवडणुका जिंकल्या खऱ्या; पण हे 'अच्छे दिन'चे हाडूक कसे गळ्यात अडकते हे इम्रानला सत्तेच्या त्या काटेरी खुर्चीवर बसल्यावरच कळेल, अशा शब्दांत पाकचे नवे 'कप्तान' इम्रान खान यांची शाळा घेता-घेता शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टोमणा मारला आहे. 

आपल्याकडे जसा राजकारणासाठी पाकिस्तानचा 'वापर' केला जातो, तोच कित्ता पाकिस्तानी राजकारणीही गिरवत असतात हे या निवडणुकीत पुन्हा एकदा दिसले, अशी खोचक टिप्पणीही 'सामना'च्या अग्रलेखात करण्यात आली आहे. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय यांनी लिहिलेल्या पटकथेनुसार पंतप्रधान होण्यासाठी निघालेल्या 'गूलछबू' इम्रान खान यांना नवा पाकिस्तान घडवता येईल काय?, असा प्रश्न करत सेनेनं इम्रान खान यांच्याकडील मर्यादित अधिकारांवरही बोट ठेवलं आहे. 

पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी हा पक्ष बहुमताच्या अगदी जवळ जाऊन पोहोचला आहे. १२० च्या आसपास जागा जिंकून इम्रान खान हेच पंतप्रधानपदाच्या खुर्चीच्या सर्वात जवळ पोहोचले आहेत. भूतकाळातील पाकिस्तानी पंतप्रधानांची कारकीर्द पाहता, इम्रान खान यांना बरीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे. हे आव्हान महाकठीण असल्याची जाणीव शिवसेनेनं करून दिली आहे.

जनतेला नव्या पाकिस्तानचे स्वप्न दाखवणाऱ्या इम्रान खान यांना खरोखरच आपल्या देशात बदल घडवायचा असेल तर सर्वात आधी पाकिस्तानचे दहशतवादी 'चरित्र' बदलावे लागेल, पराकोटीचा हिंदुस्थानद्वेष सोडावा लागेल, काश्मिरातील अतिरेक्यांची घुसखोरी थांबवावी लागेल, पाकिस्तानातील अतिरेक्यांचे अड्डे, तोयबा–जैश–तालिबानचा इस्लामी दहशतवाद नष्ट करावा लागेल, असे मुद्दे सेनेनं नमूद केलेत.   

टॅग्स :पाकिस्तान निवडणूकइम्रान खाननरेंद्र मोदीशिवसेना