तुमच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे दिसतात, त्यावर बोला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धवसेनेवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 03:48 PM2024-05-19T15:48:20+5:302024-05-19T15:49:40+5:30
दक्षिण मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या लालबाग येथील प्रचार सभेत शिंदे बोलत होते. राज्यभरात पहिल्या चार टप्प्यात महायुतीला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
मुंबई: बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांनी हिंदुत्व सोडले. आता तर त्यांना शिवरायांचा भगवा झेंडा, प्रभू रामचंद्राचा भगवा आणि वारकऱ्यांच्या भगव्या झेंड्याची अॅलर्जी झाली आहे. कारण तुमच्या प्रचार रॅलींमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकत आहेत, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धवसेनेवर केली.
दक्षिण मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या लालबाग येथील प्रचार सभेत शिंदे बोलत होते. राज्यभरात पहिल्या चार टप्प्यात महायुतीला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे महायुतीचे जास्तीत जास्त खासदार निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ते पुढे असेही म्हणाले की, आपले सरकार येण्यापूर्वी सगळी कामे बंद होती. मेट्रो कारशेड, अटल सेतु, समृद्धी महामार्ग, मुंबईचे सौंदर्गीकरण असे अनेक प्रकल्प महायुतीने सुरू केले. यापूर्वी रस्त्यावर केवळ डांबर टाकायचे आणि त्यात पैसे खायचे. यासाठी महापालिकेचे दहा वर्षात साडेतीन हजार कोटी रुपये खर्च झाले होते. पुढील २५- ३० वर्षात रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही
● रखडलेले प्रकल्प, कोणामुळे अडकलेले प्रकल्प मार्गी लावून मुंबईबाहेर फेकलेल्या मुंबईकरांना हे सरकार परत आणणार आहे. त्यासाठी बीडीडी प्रकल्प, पोलिसांची घरे म्हाडा, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, एमआयडीसीच्या माध्यमातून पुनर्विकासाचे प्रकल्प सुरु करणार आहे. मुंबईसाठी इतके वर्ष काय केले. याचा हिशेब मुंबईकर येत्या निवडणुकीत विचारल्याशिवाय राहणार नाही. ज्या उपक्रमातून मुंबईकरांना लाभ होत असेल तर हा मुख्यमंत्री ते करायला तयार आहे.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मागील २५ वर्ष सत्तेत असताना मुंबईकरांसाठी काही करता आले नाही. केवळ मतांसाठी मराठी माणूस म्हणणाऱ्या उबाठाला निवडणुकीत तडजोड करुन पाकिस्तानवादी अतिरेक्यांच्या ताब्यात मुंबई द्यायची आहे. वस्तुस्थिती पाहून मुंबईकरांनी डोळसपणे मतदान करावे, असे आवाहन मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. पक्ष कार्यालय बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री केसरकर बोलत होते. यावेळी मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.