पाकिस्तानी कलाकार कुठल्याही भारतीय कलाक्षेत्रात येणार नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 02:59 AM2019-02-20T02:59:25+5:302019-02-20T02:59:39+5:30

कलाकारांचा प्रस्ताव : कलाक्षेत्राची शहीद जवानांना श्रद्धांजली

Pakistani artists will not come in any Indian art world! | पाकिस्तानी कलाकार कुठल्याही भारतीय कलाक्षेत्रात येणार नाहीत!

पाकिस्तानी कलाकार कुठल्याही भारतीय कलाक्षेत्रात येणार नाहीत!

Next

मुंबई : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना चित्रपट, नाट्य व दूरचित्रवाणी क्षेत्रातील समूहांतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. या हल्ल्याचा निषेध आणि पाकिस्तानी कलाकार कुठल्याही भारतीय कलाक्षेत्रात येणार नाही; असा प्रस्ताव सर्वांच्या वतीने ज्येष्ठ नाट्य निर्माते अनंत पणशीकर यांनी या श्रद्धांजली सभेत मांडला.

माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलातील तालीम हॉलमध्ये मंगळवारी संध्याकाळी आयोजित श्रद्धांजली सभेत निर्माते, लेखक, दिग्दर्शक, कलावंत आदींनी हल्ल्याचा निषेध केला. यापुढे कलाक्षेत्राने काहीतरी ठोस भूमिका घ्यायला हवी आणि पूरक उपक्रम राबवायला हवा, अशी चर्चाही उपस्थितांमध्ये झाली.

पुलवामा येथील हल्ल्यात जवानांचा नाहक बळी गेला आहे. या जवानांना लढाई करण्यासाठी संधीच मिळाली नाही. अशा या नीतीचा निषेध व्हायला हवा. हे युद्ध नव्हे; तर ही सरळसरळ हत्याच आहे. हे जवान ज्या कार्यासाठी सैन्यात भरती झाले होते; त्यांचे काम अपूर्णच राहिले, अशा शब्दांत ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी या वेळी श्रद्धांजली अर्पण केली. त्या जवानांना लढण्याची संधी मिळाली असती, तर त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले असते. पण तसे होऊ शकले नाही. अशा घटनांचे प्रतिबिंब कलाक्षेत्रात पडत असते आणि त्याला ठरावीक ‘व्हॉइस’ देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. देश संकटांचा सामना नक्की करेल; परंतु अशी संकटे निर्माणच होणार नाहीत, याकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे, अशी भूमिका ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक व रंगकर्मी वामन केंद्रे यांनी मांडली.
आपण स्वत:हून कधी कुणावर आक्रमण केले नाही. पण आपल्या चांगुलपणाला दुबळेपणा समजला जात असेल तर ते चुकीचे आहे. समोरच्याला समजेल अशा भाषेत सांगणे आता आवश्यक आहे. आपल्याला हिंसा नको, पण हिंसा थांबवणे आपल्याला जमले
पाहिजे. सैन्य जो निर्णय घेईल, त्याला कलाक्षेत्राचा पाठिंबा असायला
हवा, असे मत या वेळी लेखक
अभिराम भडकमकर यांनी व्यक्त
केले.
दरम्यान, रंगकर्मी राजन भिसे, प्रमोद पवार यांच्यासह कलाक्षेत्रातील प्रसाद महाडकर, चंद्रशेखर सांडवे आदी या वेळी उपस्थित होते.

Web Title: Pakistani artists will not come in any Indian art world!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.