तरुण कश्मिरी जवानांचे हत्याकांड हा पाकिस्तानी कट, देशवासीयांना 'मन की बात' सांगणाऱ्यांना ते समजेल का?,उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 07:50 AM2017-11-27T07:50:33+5:302017-11-27T07:58:32+5:30

जम्मू-काश्मीरमधील प्रादेशिक सैन्याच्या एका जवानाचे अपहरण करुन अतिरेक्यांनी त्याची क्रूर हत्या केल्याची घटना दक्षिण काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात घडली. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.  

pakistani terrorist killed off duty jawan in kashmir | तरुण कश्मिरी जवानांचे हत्याकांड हा पाकिस्तानी कट, देशवासीयांना 'मन की बात' सांगणाऱ्यांना ते समजेल का?,उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

तरुण कश्मिरी जवानांचे हत्याकांड हा पाकिस्तानी कट, देशवासीयांना 'मन की बात' सांगणाऱ्यांना ते समजेल का?,उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

googlenewsNext

मुंबई -  जम्मू-काश्मीरमधील प्रादेशिक सैन्याच्या एका जवानाचे अपहरण करुन अतिरेक्यांनी त्याची क्रूर हत्या केल्याची घटना दक्षिण काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात घडली. शनिवारची ह घटना आहे. मृत जवानाचे नाव इरफान अहमद मीर असे असून तो सेजान कीगमचा रहिवासी होता. त्याला गोळ्या घालून मारण्यात आले. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.  ''कश्मिरी तरुणांची माथी भडकावीत आणि त्यांनी हिंदुस्थानी लष्करात जाऊन दहशतवाद्यांचा बळी घेण्याऐवजी आमच्या जवानांवर दगड फेकावेत असा पाकिस्तानी कट आहे. तरुण कश्मिरी जवानांचे हत्याकांड याच कटाचा भाग आहे. हीच पाकड्यांची ‘मन की बात’ आहे. दर रविवारी देशवासीयांना ‘मन की बात’ सांगणाऱ्यांना ती समजेल का?'', असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. 

काय आहे आजचे सामना संपादकीय?

कश्मीरमध्ये सुट्टीवर घरी आलेल्या आणखी एका कश्मिरी जवानाची हत्या झाली आहे. लष्कराच्या टेरिटोरियल विभागात कार्यरत असलेला इरफान अहमद दार हा रजेवर आपल्या शोपियान येथील शेनझेन या गावी आला होता. रविवारी त्याची सुट्टी संपत होती. मात्र शनिवारीच दहशतवाद्यांनी अपहरण केले आणि गोळय़ा झाडून त्याची हत्या केली असे आता उघड झाले आहे. लष्करात काम करणाऱ्या कश्मिरी युवकांचे नीतिधैर्य खच्ची करण्याचे आणि त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचे तंत्र दहशतवादी संघटनांकडून अमलात आणले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून रजेवर घरी आलेले लष्करातील कश्मिरी जवान, पोलीस आणि इतर सुरक्षा दलांमध्ये काम करणारे तरुण कश्मिरी अशा सर्वांना ‘लक्ष्य’ केले जात आहे. मे महिन्यात उमेर फयाज या लेफ्टनंट पदावरील जवानाची याच पद्धतीने अपहरण करून हत्या करण्यात आली होती. सप्टेंबरमध्ये रमजान पारे या सीमा सुरक्षा दलातील कॉन्स्टेबलची त्याच्या घरात शिरून दहशतवाद्यांनी हत्या केली होती. 
त्याच्या कुटुंबीयांवरदेखील गोळीबार करण्यात आला होता. आता दहशतवाद्यांच्या या नव्या तंत्राचा बळी इरफान अहमद दार हा कश्मिरी तरुण ठरला आहे. कश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये घट झाली या दाव्याला आव्हान देणारीच ही घटना आहे. त्यात जमात-उद-दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज सईद याची पाकिस्तानी न्यायालयाने नजरकैदेतून सुटका केली आहे. त्यामुळे जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये नवा जीव फुंकला जाण्याचा धोका आहे. इरफान या लष्करी जवानाची हत्या याच धोक्याची घंटा आहे. शिवाय सुटका होताच ‘कश्मीर स्वतंत्र होणारच’ ही सईद याने ठोकलेली बांगदेखील पुरेशी बोलकी आहे. सरकार जम्मू-कश्मीरमधील शे-दीडशे दहशतवादी मारले गेल्याचे आणि दगडफेकीच्या घटना कमी झाल्याचे दावे करीत आहे. मात्र त्याचवेळी कश्मिरी युवकांचे बळी घेण्याचे दहशतवाद्यांचे सत्र थांबलेले नाही. कश्मिरी तरुणाने हिंदुस्थानी लष्करात सहभागी होऊन राष्ट्रीय कार्य करणे पाकिस्तान आणि पाकपुरस्कृत दहशतवादी संघटनांच्या पचनी पडणारे नाहीच. 
त्यात मागील वर्षभरात बुरहान वाणीपासून हाफीज सईदच्या भाच्यापर्यंत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यामुळेही चवताळलेले पाकडे आणि त्यांची दहशतवादी माकडे जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा अशांतता आणि अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हाफीज सईदची नजरकैदेतून त्याचसाठी सुटका करण्यात आली आहे. जमात-उद-दवा या दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून हा सईद वर्षानुवर्षे हिंदुस्थानात दहशतवादी कारवाया करीत आला आहे. कश्मिरी तरुणांना ‘जिहादी’ बनविणे आणि ‘आझाद कश्मीर’ची बांग ठोकणे हे त्याचे उद्योग उघड उघड सुरू असतात. कश्मिरी तरुणांची माथी भडकावीत आणि त्यांनी हिंदुस्थानी लष्करात जाऊन दहशतवाद्यांचा बळी घेण्याऐवजी आमच्या जवानांवर दगड फेकावेत असा पाकिस्तानी कट आहे. श्रीनगरमधील जमिया मशिदीबाहेर पोलीस उपअधीक्षक मोहम्मद अयुब यांची जमावाने केलेली निर्घृण हत्या, उमेर फयाज, रमजान पारे, इरफान अहमद या तरुण कश्मिरी जवानांचे हत्याकांड याच कटाचा भाग आहे. हीच पाकड्यांची ‘मन की बात’ आहे. दर रविवारी देशवासीयांना ‘मन की बात’ सांगणाऱ्यांना ती समजेल का?

Web Title: pakistani terrorist killed off duty jawan in kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.