पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी- उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 08:34 AM2019-06-04T08:34:04+5:302019-06-04T08:34:22+5:30
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.
मुंबई- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. इस्लामाबादमध्ये भारतीय उच्चायुक्तांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीचा हवाला देत शिवसेनेनं पाकिस्तानवर कुरघोडी केली आहे. इस्लामाबादेत हिंदुस्थानी उच्चायुक्तांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत या झिंगलेल्या माकडांनी घातलेला गोंधळ असह्य आहे. पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी झाली आहे, असं मतही सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलं आहे. इस्लामाबाद येथे शनिवारी संध्याकाळी भारतीय उच्चायुक्तांकडून इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी आलेल्या पाहुण्यांसोबत पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी असभ्य वर्तन केले. निमंत्रित पाहुण्यांना हॉटेलच्या प्रवेशद्वारावरच रोखले. अनेकांना धमकावून परत पाठवले. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर मोदी सरकारने मुजोर पाकडय़ांची नांगी ठेचलीच आहे, पण शेपूट अजूनही वळवळत आहे, असंही टोलाही सामनातून लगावण्यात आला आहे.
- सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
- पाकिस्तानला नेतृत्व नाही, दिशा नाही म्हणून इस्लामाबादला शनिवारी घडले तसे प्रकार घडतात.
- दिल्लीतील पाक उच्चायुक्तांच्या इफ्तार पार्टीवर भारत सरकारने नियंत्रण आणले. कारण त्या पार्टीत काश्मिरातील फुटीरतावाद्यांसाठी पायघड्या घातल्या होत्या.
- भारताच्या सार्वभौम स्वातंत्र्यास आव्हान देणाऱ्यांना पाक उच्चायुक्त शिरकुर्मा खिलवणार असतील तर त्यांना रोखावे लागेल, पण इस्लामाबादमधील हिंदुस्थानी उच्चायुक्तांनी असे काहीच केले नव्हते.
- बालाकोट हवाई हल्ल्यानंतर मोदी सरकारने मुजोर पाकडय़ांची नांगी ठेचलीच आहे, पण शेपूट अजूनही वळवळत आहे. त्या शेपटाचाही बंदोबस्त आता करावा लागेल.
- पुलवामा हल्ल्याचा बदला हिंदुस्थानने घेतला. पाकडय़ांच्या घरात घुसून अतिरेकी मारले, त्यांचे तळ उद्ध्वस्त केले. तेव्हापासून पाकिस्तान तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत होते.
- हिंदुस्थानच्या राजनैतिक यंत्रणेने जोर लावून मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. हे फुटके थोबाड घेऊन पाकड्यांना जगासमोर येणे कठीणच झाले होते. त्यात मोदी सरकार पुन्हा भरघोस बहुमताने सत्तेवर आले.
- या धक्क्यातून पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान सावरणे कठीण आहे. इम्रान यांनी मोदी यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या, तसेच दोन देशांनी मिळून विकास आणि शांततेवर काम करावे अशी भावनाही म्हणे त्यांनी व्यक्त केली.
- मात्र प्रत्यक्षात शनिवारी इस्लामाबादेतील इफ्तार पार्टीप्रसंगी जे घडवले गेले ते शांतता प्रक्रियेसाठी टाकलेले पाऊल मानावे काय? पाकिस्तानचे ढोंग पुन्हा उघडे पडले आहे. पाकिस्तान कोणतीही चर्चा करण्याच्या लायकीचा देश नाही.
- हिंदुस्थानी उच्चायुक्तांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीस जे निमंत्रित होते ते सर्व इस्लामाबादमधील ‘जानेमाने’ लोक होते. ज्येष्ठ पत्रकार, लेखक, विचारवंत, कलावंत व प्रशासकीय अधिकारी यांचा त्यात समावेश होता.
- मुख्य म्हणजे हे सर्व पाक नागरिक होते. या इफ्तार पार्टीस मसूद अजहरछाप लोकांना बोलावले नाही याचा संताप बहुधा पाकला आला असावा. या सर्व निमंत्रितांना हॉटेलात शिरण्यापासून रोखले गेले.
- इतकेच नाही, तर अत्यंत अपमानास्पद पद्धतीने त्यांची झडती घेण्यात आली. दहशतवादविरोधी पथकाने कार्यक्रमस्थळी घेराव घातला व प्रत्येक निमंत्रितास तो जणू दहशतवादीच आहे अशा पद्धतीचे वर्तन केले गेले.
- पाकिस्तानात जे खरे दहशतवादी आहेत ते यांचे लाडके. त्यांच्या बाबतीत पाकचे दहशतवादविरोधी पथक कमालीचे नरम असते, पण हिंदुस्थानी उच्चायुक्तांनी आयोजित इफ्तार पार्टीबाबत मात्र ते भलतेच गरम दिसले.
- पठाणकोट हल्ला, उरीचा हल्ला व पुलवामा हल्ल्याचे धागेदोरे पाकमध्ये पोसलेल्या दहशतवाद्यांकडे असल्याचे पुरावे देऊनही नवाज शरीफ ते इम्रान खान यांच्यापैकी कोणीच ठोस कारवाई केली नाही.
- तिथे शेपूट घालायचे व इथे स्वतःच्या गल्लीत मरतुकड्या कुत्र्यासारखे भुंकायचे. पठाणकोट हल्ल्यानंतर दोन देशांतील सर्व चर्चा आणि व्यवहार बंद आहेत, व्यापार बंद आहे.
- खेळ व सांस्कृतिक संबंध तुटले आहेत. पाकिस्तानच्या बाबतीत चीनही आज कुंपणावर आहे हे अजहर मसूद प्रकरणात दिसून आले.
- कर्जाच्या डोंगराखाली पाकिस्तान चिरडून गेला आहे व दहशतवाद्यांच्या नंग्या नाचामुळे तिथे एक प्रकारे अराजक निर्माण झाले आहे. पाकिस्तान हा देश नसून जागतिक दहशतवादाची ‘फॅक्टरी’ बनली आहे.
- आयएसआय व पाकिस्तानी लष्कर मिळून पाकिस्तानवर नियंत्रण ठेवत आहेत. इम्रान खान हे लोकशाही मार्गाने निवडून आलेले पंतप्रधान आहेत हा भ्रम आहे.