Join us

पाकिस्तानच्या धुळीचे महाराष्ट्रावर वादळ, अनेक जिल्हे कचाट्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 10:12 AM

मुंबईत सर्वाधिक प्रदूषणाची नोंद

मुंबई : ऊन, वारा, पाऊस आणि थंडी अशा मिश्र वातावरणाचा फटका मुंबईसह महाराष्ट्राला बसत असतानाच आता यात आणखी एका संकटाची भर पडली आहे. पाकिस्तानातून उठलेले धुळीचे वादळ थेट महाराष्ट्रावर चाल करून आले आहे. शनिवारपासूनच या वादळाने मुंबईसह लगतच्या जिल्ह्यांना आपल्या कचाट्यात घेतले असून, सोमवारी सायंकाळपर्यंत या वादळाचा जोर कायम राहणार आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभाग, सतर्क इंडियाच्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहचले. उत्तर कोकण व मध्य महाराष्ट्रात यामुळे दृश्यमानता कमी झाली. मुंबई व पुण्यात धुळीकण वाढल्याची नोंद ‘सफर’ या यंत्रणेने केली. मुंबईत ५०० मीटर अंतरावरीलदेखील दिसत नव्हते. मात्र, विमानसेवेवर काेणताही परिणाम झाला नाही. गेल्या दहा वर्षांतील मुंबईत नीचांकी कमाल तापमानाची नाेंद झाल्याचे भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

भाईंदरमध्ये बोट उद्ध्वस्तवादळी वाऱ्याने भाईंदरमध्ये समुद्रातील चार मच्छीमार बोटींचे दोरखंड तुटून त्या किनाऱ्यावरील खडकांवर आदळल्या. त्यात एक बोट पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. 

का आले धुळीचे वादळ? उत्तर भारतात बहुतांश ठिकाणी पावसाची नोंद झाली. याच मधल्या काळात हवा स्वच्छ झाली होती. फरकामुळे हवामानात बदल झाले आहेत. यामुळे धुळीचे वादळ उठले आहे. धुळीच्या वादळामुळे प्रदूषणात वाढ झाली. हवेचा दर्जा घसरला आहे. सोमवारी सायंकाळी धुळीचे वादळ निवळून जाईल.    - डॉ. गुफरान बेग, प्रकल्प संचालक, सफर

 

टॅग्स :पाकिस्तानधुळीचे वादळ