पाकचे माजी मंत्री सेनेच्या रडारवर
By admin | Published: October 11, 2015 02:07 AM2015-10-11T02:07:38+5:302015-10-11T02:07:38+5:30
पाकचे प्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांच्या नियोजित कार्यक्रमाला शिवसेनेने केलेल्या विरोधामुळे रद्द करण्याची नामुश्की आयोजकांवर ओढावली असताना आता पाकिस्तानचे
मुंबई : पाकचे प्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांच्या नियोजित कार्यक्रमाला शिवसेनेने केलेल्या विरोधामुळे रद्द करण्याची नामुश्की आयोजकांवर ओढावली असताना आता पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री खुर्शीद मेहमूद कसुरी यांच्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभही वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत. आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या वतीने येत्या सोमवारी (दि.१२) नेहरू तारांगणात होणाऱ्या या समारंभालाही शिवसेनेने विरोध दर्शविलेला आहे. हा कार्यक्रम रद्द न केल्यास तो उधळून लावू, अशी धमकीवजा इशारा सेनेच्या वतीने तारांगण सभागृहाच्या संचालकांना देण्यात आला आहे.
दरम्यान, संयोजकांनी कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी योग्य सुरक्षा पुरविण्यात यावी, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातले आहे. संयोजक सुधींद्र कुलकर्णी यांनी त्याबाबत शनिवारी त्यांना लेखी निवेदन देऊन सुरक्षेची मागणी केली आहे.
प्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमाला सेनेने विरोध दर्शविल्यानंतर त्यासाठी आवश्यक संरक्षण पुरविण्याची हमी मुख्यमंत्र्यांनी आयोजकांना दिली होती. मात्र त्यानंतरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर आयोजकांनी कार्यक्रम रद्द केल्याचे जाहीर केले.
त्यामुळे याबाबत राजकीय व कलावंत मंडळीकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठलेली आहे. त्याच पाश्वभूमीवर पाकचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद मेहमूद कसुरी यांचा पुस्तक प्रकाशन सोहळा मुंबईत होणार असल्याने त्याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले
आहे. (प्रतिनिधी)
शिवसेनेचे नेहरू तारांगणला पत्र : ओआरएफने आयोजित केलेल्या पाकचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद मेहमूद कसुरी यांनी लिहिलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळा रद्द करावा याबाबत संचालकांना पत्र लिहिले आहे. कार्यक्रम उधळून लावण्यास शिवसेना सक्षम असल्याचे म्हणत ‘सेना स्टाईल’ आंदोलन करण्यात येईल, असे म्हटले आहे.
कार्यक्रम होणारच - कुलकर्णी : ओआरएफचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, १२ तारखेचा कार्यक्रम कोणत्याही परिस्थितीत होईल. कार्यक्रमस्थळी कायदा-सुव्यवस्था असावी ही राज्य सरकारची जबाबदारी आहे आणि सरकार ती निभावेल, असा आमचा विश्वास आहे. पुस्तक प्रकाशन समारंभ आयोजित करणे हा आमचा अधिकार आहे. शिवसेनेला विरोध करायचाच असेल तर तो त्यांनी शांततापूर्वक करावा. ४ दिवसांपूर्वी नवी दिल्लीत याच पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्या वेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या देशभक्तीबाबत शिवसेनेला शंका आहे का, असा सवालही कुलकर्णी यांनी केला.