पाकिस्तानच्या घुसखोरीमुळे काश्मीरमधील दहशतवादविरोधी लढाई सुरूच राहणार - हेमंत महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:08 AM2021-08-18T04:08:32+5:302021-08-18T04:08:32+5:30
मुंबई : काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाचे कंबरडे जवळपास मोडले आहे. लडाख, जम्मू - उधमपूर येथे दहशतवादी कृत्ये दिसत नाहीत. मात्र ...
मुंबई : काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाचे कंबरडे जवळपास मोडले आहे. लडाख, जम्मू - उधमपूर येथे दहशतवादी कृत्ये दिसत नाहीत. मात्र काश्मीर खोऱ्यात आजही दोनशेच्या आसपास दहशतवादी असून भारतीय लष्कर कारवाई करून त्यांना मारत आहे. मात्र पाकिस्तानकडे दहशतवादी घुसवण्याची क्षमता अधिक असल्याने भारताची काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात लढाई सुरूच राहणार आहे, असे मत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. ‘गेल्या ७५ वर्षांत संरक्षण क्षेत्रातील बदल’ या विषयावर १५ ऑगस्ट रोजी त्यांनी व्याख्यान दिले. यावेळी त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यापासून लढलेली युद्धे, पाकिस्तानने बदललेले लढाईचे धोरण याबद्दल सांगितले.
ऑपरेशन काराकोरमविषयी ते म्हणाले की, काराकोरम युध्दाचे तीन भाग होते. काराकोरम एक म्हणजे खलिस्तान, काश्मीरमध्ये छुपे युध्द किंवा दहशतवाद आणि देशाच्या इतर भागात दहशतवाद सुरू करणे. त्याचप्रमाणे अंतर्गत सुरक्षेची आव्हाने, बाह्य सुरक्षेची आव्हाने, सोशल मीडिया, हायब्रीड युद्ध, आर्थिक युद्ध वा व्यापार युद्ध याबद्दलही त्यांनी माहिती दिली.
अफगाणिस्तानातील स्थितीबद्दल ते म्हणाले की, अमेरिकी सैन्य परत जाऊ लागल्याने अफगाण सैन्य आणि तालिबान यांच्यात गृहयुध्द सुरू झाले आहे. तालिबान्यांना पाकिस्तान आणि चीन मदत करीत आहे. येणाऱ्या काळात या गृहयुध्दाची व्याप्ती अधिक वाढेल. तालिबान सत्तेमध्ये आले, तर पाकिस्तान तालिबानच्या मदतीने भारतात दहशतवाद वाढविण्याचा प्रयत्न करेल. म्हणून दहशतवादाच्या लढाईकरिता भारतीय सैन्याला सदैव तयार राहावे लागेल. यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःला प्रश्न करायला हवा की, मी देशासाठी काय करू शकतो? आपल्या क्षेत्रात चांगली कामगिरी करून जागतिक दर्जा आपण मिळविणे हे देशासाठीही महत्त्वाचे आहे.