तारापूर पोस्ट कार्यालय की गोठा?
By Admin | Published: May 1, 2016 02:31 AM2016-05-01T02:31:02+5:302016-05-01T02:31:02+5:30
झपाट्याने पसरलेले कुरियर सेवेचे जाळे, नेट व ईमेल द्वारे जलद गतीने पोहोचणारे संदेश व पत्र तसेच मोबाईलच्या माध्यमातुन एसएमएस आणि व्हॉट्सअॅपने संदेशाबरोबरच
- पंकज राऊत, बोईसर
झपाट्याने पसरलेले कुरियर सेवेचे जाळे, नेट व ईमेल द्वारे जलद गतीने पोहोचणारे संदेश व पत्र तसेच मोबाईलच्या माध्यमातुन एसएमएस आणि व्हॉट्सअॅपने संदेशाबरोबरच ग्रामीण भागात अमुलाग्र बदल झाला असल्याने एकेकाळी सर्वांचा आधार असलेले पोस्ट काहीसे दुर्लक्षीत होत असून पोस्ट कार्यालयाच्या इमारतीची अवस्थाही दयनीय झाली आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे तारापुरचे पोस्ट कार्यालय.
भारतातील पहिले तारापुर अणुऊर्जा केंद्र व भाभा अणु संशोधन केंद्र या दोन महत्वाच्या प्रकल्पामुळे तारापुर जगाच्या नकाशावर पोहोचले त्या प्रकल्पापासून काही अंतरावर असलेले व सुमारे १०६ वर्षापुर्वी सुरू केलेल्या तारापूर पोस्ट कार्यालयाद्वारे हजारो नागरीकांना टपाल सेवा पुरविली जाते. मात्र त्याच कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर मोठा खड्डा पडला आहे. तर आतील फरशा तुटून झालेल्या लहान लहान खड्ड्याचा वयोवृद्धांना अडथळा ठरत पोस्ट कार्यालयात स्वच्छतागृहाअभावी कर्मचाऱ्यांची कुचंबना होत आहे.
इमारतीच्या एका खोलीतील छत कोसळण्याच्या स्थितीत असल्याने त्याला लाकडाच्या टेकुचा आधार देऊन कसेबसे थोपवून ठेवले आहे. तर पावसाच्या पाण्याची गळती रोखण्यासाठी टाकलेले प्लास्टीकही जिर्ण झाल्याने पाण्याच्या गळतीमुळे महत्वाचे दस्तऐवज भिजण्याची शक्यता आहे. भिंतीही जीर्ण झाल्या असून खिडक्यांचीही खिळखिळी अवस्था झाल्याने सर्वच धोकादायक परिस्थिती असल्याने पोस्टातील कर्मचारी व नागरीक भितीच्या छायेमध्ये आहेत.
एकेकाळी होती ५० लाखांची उलाढाल
साधारणत: १९१० ते १५ साली सुरू केलेल्या तारापूर पोस्टातून महिन्याकाठी सुमारे पन्नास ते साठ लाखाची उलाढाल होत होती. येथून भारतातील विविध राज्यांमध्ये सोन्याचे दागिने बनविणाऱ्या डाय (साचे) मोठ्या प्रमाणात पार्सल रुपात पाठविण्यात येतात.
पुर्वी तारापुर हे पोस्टमेन पोस्ट होते. पोस्टाच्या विविध स्कीमच्या माध्यमातुन गुंतवणूक होत असून तेथे आज फक्त दोन कर्मचारी कार्यरत आहेत. तर सध्या सुरू करण्यात आलेल्या आॅनलाईन कोअर बँकींगची सर्विस सुरू केली असून ते सॉफ्टवेअर अत्यंत स्लो काम करणारे असल्याने लोकांची कामे रखडून राहीली आहेत.