पालखीतून मंडपात येतो बाप्पा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2016 03:21 AM2016-08-08T03:21:52+5:302016-08-08T03:21:52+5:30
१०-१२ तासांचे आगमन सोहळे, डीजेचा आवाज आणि वाहतुकीचा खोळंबा यामुळे गेल्या काही वर्षांत गणेशोत्सव म्हटले की, मुंबईकरांना टेन्शनच येते.
पूजा दामले/स्नेहा मोरे, मुंबई
१०-१२ तासांचे आगमन सोहळे, डीजेचा आवाज आणि वाहतुकीचा खोळंबा यामुळे गेल्या काही वर्षांत गणेशोत्सव म्हटले की, मुंबईकरांना टेन्शनच येते. मात्र या सगळ्या बदलत्या प्रवाहातही फणसवाडी जगन्नाथ चाळीतील गणेशोत्सवाने आपले वेगळेपण जपले आहे. गेली १२० वर्षे धर्मैक्य संरक्षक संस्थेच्या जगन्नाथ चाळीचा बाप्पा पालखीतून मंडपात विराजमान होतो. उत्सवातील पारंपरिकतेची कास धरत अनेक वर्षे हे मंडळ गणेशोत्सव साजरा करीत आहे.
गणेशोत्सवादरम्यान समाजप्रबोधक उपक्रम आणि कार्यक्रमांकडे मंडळाचा अधिक कल असतो. गेली अनेक वर्षे भजन, कीर्तन, प्रवचन यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पिढ्यांतील व्यक्तींच्या प्रबोधनावर मंडळाचा भर असतो. या मंडळाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे,धर्मैक्य संरक्षक संस्था, जगन्नाथ चाळ सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ गेली शंभरहून अधिक वर्षे पावणे दोन फुटांची शाडूची मूर्ती आणतात. प्रदूषण टाळण्याकरिता उत्सवाचा मूळ उद्देश जपण्यासाठी हे पाऊल मंडळाने उचलले आहे.
मैदानी खेळ : लहानग्यांनी यात सहभाग घ्यावा यासाठी ज्येष्ठांकडून सातत्याने प्रोत्साहन दिले जाते. आपल्या मातृभाषेप्रति गोडी टिकविण्यासाठी मंडळातर्फे मराठी, संस्कृत भाषेतील स्त्रोत्रपठण, मंत्रोच्चार असे उपक्रम राबविले जातात. या वेळी भाषातज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी व्यक्तींना उच्चार शिकविले जातात.
जुन्या-जाणत्या माणसांना जोडण्यासाठी महाप्रसाद
वाढते शहरीकरणामुळे येथील मूळ रहिवाशांनी विविध ठिकाणी स्थलांतर केले आहे. मात्र दूर गेलेल्या या माणसांना जोडण्यासाठी मंडळाच्या वतीने विशेष महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या माध्यमातून जुन्या-जाणत्या, दुरावलेल्या सर्वांनी एकत्र येऊन प्रसादाचा लाभ घ्यावा हा मंडळाचा उद्देश आहे.
युवांना मिळताहेत मॅनेजमेंटचे धडे
नोकरीच्या अनिश्चित वेळांमुळे आजची तरुणाई अधिकच व्यस्त झाली आहे. मात्र या गणेशोत्सवाच्या निमित्ताने ही युवा पिढी आवर्जून एकत्र येते आणि उत्सवात मांडव घालण्यापासून सर्वच कामांत हिरिरीने सहभाग घेते. सध्या मंडळात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांची ही चौथी पिढी आहे.
कीर्तन, प्रवचनांचा उपक्रम : एक वर्ष कीर्तन आणि एक वर्ष भजनाचे आयोजन केले जाते. शिवाय, तंत्रज्ञानाच्या विश्वाचा वाढता ओघ लक्षात घेऊन लहान मुलांना मैदानी खेळांकडे उद्युक्त करण्यासाठी मैदानी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन मंडळाच्या वतीने केले जाते.