तिन्ही रेल्वे मार्गांभोवती तळे; एक हजारांहून अधिक फेऱ्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 04:14 AM2019-07-03T04:14:25+5:302019-07-03T04:27:29+5:30
मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजता उपनगरी लोकलसेवा सुरू केल्याने तब्बल १६ तासांनी प्रवाशांना दिलासा मिळाला.
मुंबई : सलग चार दिवस पावसाचा जोर कायम राहिल्याने, उपनगरी रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली. पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे रेल्वे मार्गावर पाणी साचले होते. परिणामी, पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल २० ते ३० मिनिटे उशिराने धावत होत्या, तर मध्य आणि हार्बर रेल्वे मार्ग पूर्णपणे ठप्प झाले. मंगळवारी सुमारे १००० हून अधिक फे-या रद्द झाल्या. मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजता उपनगरी लोकलसेवा सुरू केल्याने तब्बल १६ तासांनी प्रवाशांना दिलासा मिळाला.
दुपारच्या सुमारास मध्य रेल्वे प्रशासनाने सीएसएमटी स्थानकातून चार विशेष लोकल सोडल्या. या लोकल कर्जत, बदलापूर, कल्याण, टिटवाळा या दिशेकडे गेल्या.
नौदलाची मदत
कुर्ला परिसरातील १ हजार नागरिकांना नौदलाच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलविले. पाण्यात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी नौदलाची मदत घेण्यात आली.
आज या मेल, एक्स्प्रेस रद्द
मुंबई-वाराणसी महानगरी एक्स्प्रेस, मुंबई-भुसावळ पॅसेंजर, पुणे-सोलापूर एक्स्प्रेस, सोलापूर-पुणे एक्स्प्रेस, मुंबई-पुणे इंटरसिटी, पुणे-मुंबई इंटरसिटी, पुणे-मुंबई सिंहगड, मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-पुणे प्रगती, पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस, मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस, मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस, मनमाड-एलटीटी एक्स्प्रेस, एलटीटी-मनमाड एक्स्प्रेस, पुणे-पनवेल पॅसेंजर, पनवेल-पुणे पॅसेजर या एक्स्प्रेस बुधवारी रद्द करण्यात आल्या आहेत.
अतिमुसळधारेचा इशारा
३ जुलै : पालघर, ठाणे जिल्हयात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल.
३ ते ६ जुलै : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हयात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल.
व्होडाफोन, आयडियाचे नेटवर्क झाले गायब
पावसाने मुंबईतील जनजीवन विस्कळीत केलेले असताना संकटात सापडलेल्या जीवलगांची, नातेवाईकांची माहिती घेण्यासाठी मोबाईल कॉल करणाºया व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांना मंगळवारी काही काळ नेटवर्क गायब झाल्याने संपर्क साधता आला नाही.