Join us

पॅलेस्टाईन- इस्राईल वाद - ठिणगी कि वणवा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:07 AM

---------सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर पॅलेस्टाईन आणि इस्राईल यांच्यामध्ये जी धुमश्चक्री सुरु आहे त्याची परिणती कदाचित एका मोठ्या स्तरावरच्या युद्धात ...

---------

सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर पॅलेस्टाईन आणि इस्राईल यांच्यामध्ये जी धुमश्चक्री सुरु आहे त्याची परिणती कदाचित एका मोठ्या स्तरावरच्या युद्धात होण्याची चिन्ह दिसत आहेत. देव करो आणि असं न होवो कारण अशा गोष्टी कुठल्या थराला जातील याचा नेम नाही. मुळात ही स्थिती निर्माण का झाली हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं इतिहासात डोकवावं लागेल.

वास्तविक पाहता इस्रायली लोक हे अति प्राचीन काळापासून जगात अस्तित्वात आहेत. धर्म ग्रंथांत त्यांचा उल्लेख ' बेनी इस्राईल ' असा झालेला आढळतो. प्रेषित मोझेस यांनी त्यांना रीतसर एक धर्म दिला आणि त्यानंतर ते ज्यू किंवा यहूदी या नावाने ओळखले जाऊ लागले. हे घडलं १४ ते १३ शे ख्रिस्तपूर्व काळात. त्याही पूर्वी प्रेषित अब्राहाम यांनी ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात या ' बेनी इस्राईल ' लोकांचं नेतृत्व केलं होतं आणि ' जर तुम्ही धर्माप्रमाणे वागाल तर देव तुम्हाला असा देश देईल जिथे तुम्ही सुखी आणि समृद्ध जीवन जगू शकाल ' असं सांगितलं होतं. तो देश म्हणजे इजिप्तची नाईल नदी ते युफ्रेटीस नदी यांच्या मधला प्रदेश. त्यामुळे हाच प्रदेश म्हणजे आपला देश असं ज्यू लोकांनी गृहीत धरलं आणि त्यावर आपला हक्क सांगितला आणि तिथे वसाहती करायला सुरवात केली. या प्रदेशावर तेव्हा अरबांचा अधिकार होता. त्यामुळे हे आगंतुक ज्यू येऊन आपला प्रदेश बळकावत आहेत या भावनेपोटी अरब- इस्राईल वैराला सुरवात झाली. त्यातूनच इजिप्त बरोबरचं ' सहा दिवसांचं युद्ध ' घडलं. हेच वैर १९४८ पासून वेळोवेळी उफाळून येत राहिलं आणि सध्याचं जे रणकंदन सुरु आहे ते याच वैराची नवी आवृत्ती आहे.

ही फक्त जागेचीच मारामारी नव्हे. हा प्रदेश ज्यू, मुसलमान आणि ख्रिश्चन या तिन्ही धर्मांच्या लोकांसाठी खूप पवित्र मानला जातो. कारण तिथे यरुशलेम आहे. तिथे जी मशीद आहे ती वेगवेगळ्या धार्मिक कारणांसाठी तिन्ही धर्माच्या अनुयायांना पवित्र आहे. तिन्ही धर्मांनी या यरुशलेमवर आपला हक्क सांगत त्यावर आपला अधिकार वेळोवेळी गाजवण्याचा प्रयत्न केला. याच मशिदीच्या पावित्र्याची पायमल्ली इस्राईलने केल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटलंय.

या पार्श्वभूमीवर सध्या चाललेलं रणकंदन हे कदाचित चिघळण्याची भीती यासाठी आहे की, सबंध मुस्लीम समाजाला इस्राईलविरुद्ध एकवटण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. पाकिस्तान आणि तुर्की याबाबतीत पुढाकार घेत सगळ्या मुस्लीम देशांना आवाहन करत आहेत. रशियालासुद्धा मध्यस्तीत घालण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रांद्वारे इस्राईलवर दबाव आणला जात आहे. इस्राईलच्या पाठीशी अमेरिका आणि अन्य युरोपीय देश असल्याने त्याची ती बाजू भक्कम आहे. त्यामुळे इस्राईल कुणाचीही फारशी पर्वा करताना दिसत नाहीये. ही परिस्थिती गंभीर आहे.

आता या सगळ्या परिस्थितीत भारताची काय भूमिका आहे हे सुद्धा जाणून घेऊया. सुरवातीपासूनच भारताने पॅलेस्टाईनला पाठिंबा दिलाय. पॅलेस्टाईन संघटनेचे अध्यक्ष दिवंगत यासर अराफत हे इंदिरा गांधींना बहीण मानत. राजीव गांधींची कदाचित हत्या होईल ही " टीप " सुध्दा म्हणे यासर अराफतने भारताला आधीच दिली होती. जेव्हा १५.११.१९८८ साली पॅलेस्टाईन राष्ट्राची घोषणा झाली तेव्हा त्याला सर्वप्रथम मान्यता देणाऱ्यांपैकी आपण होतो. असे असताना आता नेमकं कुणाच्या बाजूने उभं राहावं हा आपल्या पुढला प्रश्न आहे.

सरसकट इस्राईलच्या बाजूने उभं राहावं तर बऱ्याच पॅलेस्टाईनच्या मित्रांचा रोष ओढवून घ्यावा लागेल. शिवाय पॅलेस्टाईनशी प्रतारणा केल्याचं पापही माथी येईल ते वेगळंच. त्यामुळे आपण एक राजमान्य मार्ग स्वीकारलाय. आपण पॅलेस्टाईनच्या हमासने इस्राईलवर केलेल्या रॉकेट हल्ल्यांची निंदा केलीय तसंच इस्राईलने केलेल्या बॉम्ब हल्ल्यांची सुद्धा निर्भत्सना केलीय. तुम्ही दोघेही जे करता आहेत ते विश्वशांतीसाठी धोक्याचं आहे त्यामुळे लवकरात लवकर हे सगळं बंद करा, असा व्यवस्थित संदेशही दोन्ही राष्ट्रांना दिलाय. आपले संयुक्त राष्ट्रातले राजदूत टी. एस. तिरुमूर्ती यांनी हा आपला संदेश सादर केला. हे जरी जनरीतीला धरूनच झालं असलं तरी ते इस्राईलला खटकलंय. त्याने इस्राईलला पाठिंबा दिलेल्या राष्ट्रांची यादी जाहीर केली आणि त्यांचे आभार मानले. पण काल परवापर्यंत स्वतःला भारताचा मित्र म्हणवणाऱ्या इस्राईलने त्या यादीत भारताचा कुठे उल्लेखही केला नाही. तूर्तास तरी संयुक्त राष्ट्र आपल्या परीने या लढाया मिटवायचा प्रयत्न करत आहे. देव करो आणि त्यांच्या प्रयत्नांना यश येवो. संबंध जग एके ठिकाणी कोरोनाशी लढत असताना आणखी दुसरी वैश्विक आपत्ती नकोच.

- मोहम्मद अली नाईक ( लेखक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवरील अभ्यासक आहेत.)