पालघरच्या व्यावसायिकाची १५ कोटींची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 06:24 IST2024-12-23T06:24:06+5:302024-12-23T06:24:43+5:30
गुंतवलेल्या सोन्यावर महिन्याला दोन टक्के नफा तसेच जास्तीचे पैसे देणार असल्याचे प्रलोभन दाखवले.

पालघरच्या व्यावसायिकाची १५ कोटींची फसवणूक
मुंबई : गुंतवणुकीच्या नावाखाली पालघरच्या व्यावसायिकाची १५ कोटींना फसवणूक झाली आहे. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी तेजस सोनीविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. हा गुन्हा पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
पालघरचे रहिवासी अमित जयतीलाल मेहता (५२) यांच्या तक्रारीनुसार, तेजस सोनी यांनी हुन्नर गोल्ड कंपनीचे संचालक गिरीराज अग्रवाल यांना त्यांच्या व्यवसायात सहभागी होण्यास सांगितले. त्या बदल्यात गुंतवलेल्या सोन्यावर महिन्याला दोन टक्के नफा तसेच जास्तीचे पैसे देणार असल्याचे प्रलोभन दाखवले. त्यानुसार, हुन्नर कंपनीने १२ कोटी ४ लाख ४७ हजार ६५० रुपये किमतीचे २० किलो सोन्याची गुंतवणूक करत करार केला. मात्र, तेजस ललीत सोनी यांनी अॅग्रिमेंटमध्ये ठरलेल्या सर्व अटी शर्तीचा भंग केला.
करारानुसार, २० किलो सोने आणि त्यावरील नफा ४५ दिवसांत देणे असताना ते परत न करता फक्त आश्वासने दिली. या १५ कोटी १० लाख ४७ हजार ६५० रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा प्रकार ८ जून २०२३ ते २२ जून २०२४ कालावधीत झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.