'एकत्र लढा, नाहीतर पडा'; पालघर पोटनिवडणुकीचा धडा!
By अमेय गोगटे | Published: June 1, 2018 01:21 PM2018-06-01T13:21:52+5:302018-06-01T13:21:52+5:30
भाजपा, शिवसेना आणि बविआ या तीन पक्षांनी पालघरची पोटनिवडणूक जिंकण्यासाठी जे जे शक्य ते ते केलं होतं. त्याची प्रचिती मतांचे आकडे पाहून सहज येते.
मुंबईः भाजपा आणि शिवसेनेनं प्रतिष्ठेच्या केलेल्या आणि परिणामी संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाने बाजी मारली आहे. ही निवडणूक जिंकून शिवसेनेला अद्दल घडवल्यानं, इंगा दाखवल्यानं भाजपाचा आनंद गगनात मावत नाहीए, तर पालघरमधील पराभवाच्या दुःखापेक्षा, देशात भाजपा आपटल्यानं शिवसेना खूश झालीय. परंतु, ही वेळ आनंद साजरा करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करण्याची आहे, असं राजकीय विश्लेषकांना वाटतंय. फक्त भाजपा आणि शिवसेनेलाच नाही; तर इतर पक्षांनाही या पोटनिवडणुकीनं एक धडा शिकवलाय. तो म्हणजे, एकत्र लढा, नाहीतर पडा!
भाजपा, शिवसेना आणि बविआ या तीन पक्षांनी पालघरची पोटनिवडणूक जिंकण्यासाठी जे जे शक्य ते ते केलं होतं. त्याची प्रचिती मतांचे आकडे पाहून सहज येते. भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांना २,७२,७८२ मतं मिळाली, तर शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांना २,४३,२१० मतदारांनी कौल दिला. बळीराम जाधव यांनीही २ लाखांचा आकडा पार करून २,२२,८३८ मतं मिळवली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (किरण गहाला - ७१,८८७ मतं) चौथ्या आणि काँग्रेस (दामोदर शिंगडा - ४७,७१४ मतं) पाचव्या क्रमांकावर राहिला. राजेंद्र गावित यांचं मताधिक्य २९,५७२ इतकं आहे, पण ते 'फक्त' म्हणावं लागेल. कारण, २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने ही जागा २ लाख ३९ हजार ५२० मताधिक्यानं जिंकली होती. हा मोदी लाटेचा परिणाम होताच, पण भाजपा-शिवसेनेला एकत्र लढल्याचाही मोठ्ठा फायदा झाला होता.
पालघर पोटनिवडणुकीत युती का झाली नाही, कुणामुळे झाली नाही, हा मुद्दा आता मागे पडलाय. पण युती झाली असती, तर सार्वत्रिक निवडणुकीत चिंतामण वनगा यांना जेवढी मतं मिळाली होती, तेवढीच - म्हणजेच ५,३३,२०१ मतं यावेळीही युतीच्या उमेदवाराला मिळू शकली असती. राजेंद्र गावित आणि श्रीनिवास वनगा यांच्या मतांची बेरीज ५,१५,९९२ इतकी होते. एकूण ८,८६,८७३ मतांपैकी ५ लाखांहून अधिक मतं मिळणं हे निश्चितच मोठं यश ठरलं असतं.
शिवसेना आणि भाजपा वेगवेगळे रिंगणात उतरलेत हे कळल्यानंतर, काँग्रेसनं २०१४च्या निवडणुकीप्रमाणेच बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना पाठिंबा देण्याची खेळी केली असती, तर भाजपाला रोखण्याचे त्यांचे प्रयत्न 'शत-प्रतिशत' यशस्वी झाले असते. बळीराम जाधव आणि दामोदर शिंगडा यांच्या मतांची बेरीज २,७०,५५२ इतकी होते. एकत्र प्रचार केला असता, अधिक जोर लावला असता तर हा आकडा राजेंद्र गावित यांच्या २,७२,७८२ मतांच्या पुढे जाणं सहज शक्य होतं.
थोडक्यात काय तर, ईव्हीएम मशीन बिघाड, ईव्हीएम घोटाळा, निवडणूक आयोगाला दोष देत बसण्यापेक्षा आपलं काय चुकलं हे सर्वच पक्षांनी तपासून पाहायला हवं. एकीचं बळ खूप जास्त असतं, हेच त्यातून लक्षात येईल. त्याच जोरावर भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीनं आणि कैरानामध्ये राष्ट्रीय लोक दलानं विजय मिळवला आहे. हे दोन्ही पराभव भाजपाला विचार करायला लावणारे आहेतच, पण पालघरच्या विजयावरही त्यांनी चिंतन करणं गरजेचं आहे.