पालघर जिल्ह्याचा होणार विकास

By admin | Published: April 14, 2016 01:30 AM2016-04-14T01:30:31+5:302016-04-14T01:30:31+5:30

कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत पालघरच्या विविध पर्यटन विकास कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने जिल्ह्यात विकासगंगा येणार आहे.

Palghar district will be developed | पालघर जिल्ह्याचा होणार विकास

पालघर जिल्ह्याचा होणार विकास

Next

- पंकज रोडेकर,  ठाणे
कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत पालघरच्या विविध पर्यटन विकास कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने जिल्ह्यात विकासगंगा येणार आहे.
यानुसार, जिल्ह्यातील केळव्यासह सहा स्थळे निश्चित करून तेथील कामांची यादी बनवण्यात आली आहे. यासाठी अंदाजे २६५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कामांमध्ये सुशोभीकरण, बैठक व्यवस्था, विद्युत दिवे आदींचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नव्याने पालघर जिल्ह्याची निर्मिती केली. त्यामुळे कोकणात आणखी एका जिल्ह्याची भर पडली.
आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या या जिल्ह्यात पर्यटनाद्वारे विकास व्हावा, म्हणून कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत या विकासकामांना ही मान्यता देण्यात आली आहे. हा पर्यटन विकास करताना प्रामुख्याने केळवा, शिरगाव, माहीम, शिरपामाळ, महालक्ष्मी आणि डहाणू या स्थळांना प्राधान्य दिले आहे. यामध्ये सर्वाधिक खर्च डहाणू येथे करण्यात येणार आहे.
केळव्यात ४६ लाखांची कामे होणार असून यामध्ये सुरूच्या बागेजवळ स्वागतकक्ष बांधणे, सुशोभीकरण, बैठक व्यवस्था, केळवा बीच रस्ता ते भुईकोट किल्ला पोहोच रस्ता तयार करणे, सुरूच्या बागेजवळ खुला मंच तसेच गाळे उभारणे, त्याचबरोबर सार्वजनिक विद्युत दिवे लावण्यात येणार आहेत.
शिरगाव मुख्य रस्ता ते समुद्र रस्ता काँक्रीटचा तयार करणे, स्मशानभूमी रस्त्याच्या उजव्या बाजूस प्रसाधन व स्वच्छतागृह, बायोटॉयलेट व चेंजिंग रूम, बैठक व्यवस्था करणे, पोहोचरस्ता ते किनाऱ्यापर्यंत सार्वजनिक विद्युत दिवे व बीचवर हायमास्ट लावणे, या एकूण कामांसाठी २९ लाख खर्च म्हणून अपेक्षित धरला आहे.
माहीम (टेंभी) मध्ये केळवा-माहीम मुख्य रस्ता ते माहीम किनारा पोहोचरस्ता तयार करणे, माहीम किनाऱ्याला स्वागत कक्ष, बैठक व्यवस्थापन करणे, विक्रीसाठी हातगाडी पुरवणे, स्मशानभूमी, उजव्या रस्त्याच्या बाजूस प्रसाधनगृह व स्वच्छतागृह, बायोटॉयलेट व चेंजिंग रूम बांधणे, सार्वजनिक विद्युत दिवे व बीचवर हायमास्ट लावण्यासाठी ३४ लाख खर्च होणार आहे.
जव्हार-शिरपामाळ येथे रा.मा.३० ते शिरपामाळ स्तंभाच्या गेटपर्यंत रस्ता, संरक्षक भिंत रोलिंग करणे, शिरपामाळ येथील स्तंभाजवळ रस्ता तयार व बैठक व्यवस्था करणे तसेच शिरपामाळ येथील स्तंभाभोवती सार्वजनिक विद्युत दिवे या सर्व कामांसाठी २५ लाख खर्च अपेक्षित धरला आहे.
महालक्ष्मी येथील पोहोचरस्ता तयार करणे, महालक्ष्मी मंदिर रा.मा. ८ पर्यंत, प्रसाधन व स्वच्छतागृह बायोटॉयलेट व चेंजिंग रूम बांधणे, महालक्ष्मी मंदिर रस्ता व परिसरात सार्वजनिक विद्युत दिवे लावण्यासाठी ३९ लाख रुपये अपेक्षित धरले आहेत.

डहाणूत सर्वाधिक केला जाणार खर्च
डहाणूमधील बोर्डीत प्र.रा.मा.४ ते बोर्डी समुद्रकिनाऱ्यापर्यंत रस्ता करणे, बोर्डी समुद्रकिनारा परिसरात प्रसाधन व स्वच्छतागृह बांधणे, तर नरपड येथे गाळे बांधणे आणि चिखला येथील समुद्रकिनारा व जोडरस्त्यावर सार्वजनिक दिवे आणि हायमास्ट लावणे, या कामांसाठी अंदाजे ४७ लाखांचा खर्च केला जाणार आहे.
कुतुरविहीर येथे रा.मा. ७७ ते जयसागर डॅमपर्यंत पोहोचरस्ता करणे, जयसागर डॅम येथे रस्ता तयार करणे, संरक्षक भिंत बांधणे, तसेच तेथील बगिच्यामध्ये खुला मंच तयार करणे, डस्टबिन, बाकडे, वाहनतळ, स्वच्छतागृह, गाळे बांधणे, विद्युत दिवे व जलनि:सारण, रस्ता व्यवस्था करणे, या कामांसाठी ४५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

Web Title: Palghar district will be developed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.