पालघरच्या डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर आल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या जमावाने तिघांची हत्या केल्याची घटना 16 मार्च रोजी घडली होती. यानंतर पोलिसांनी कारवाई करत हत्याकांड प्रकरणातील 110 आरोपींना अटक केली होती. यामधील एका आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हत्याकांड प्रकरणातील अटकेत असणाऱ्या आरोपींपैकी जवळपास 20 आरोपींना वाडा पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. यावेळी अटक करण्यात आलेल्या आरोपांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामधील एका आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचं समोर आलं आहे. 28 एप्रिलला त्याच्या स्वॅबचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले होते तो रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र आरोपीचा शनिवारी सकाळी प्राप्त झालेला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता प्रशासनाची देखील तारंबळ उडाली आहे.
कोरोनाबाधित आरोपीला चार दिवसांपूर्वीच त्या कोरोनाबाधित आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले होते, अशी माहिती सिव्हिल सर्जन कांसन वानेरे यांनी दिली. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरु असल्याचे कांसन वानेरे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आतापर्यंत सोबतचे आरोपी आणि 23 पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून या सर्वांचे घशाचे नमुने घेण्यात येत आहे. तर वाडा, गडचिंचले, डहाणू या भागातील संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू आहे असं कांसन वानेरे यांनी सांगितले आहे.
तत्तपूर्वी, या हत्याकांडप्रकरणी सुरुवातील 101 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आणखी 9 जणांना ताब्यात घेतल्यामुळे संख्या 110 वर पोहोचली. या सर्व आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली असून त्यांना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे.
पालघरमध्ये नेमकं काय घडलेलं?
डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर आल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या जमावाने तिघांची हत्या केल्याची घटना गेल्या आठवड्यात गुरुवारी रात्री घडली. यावेळी समजूत घालण्यासाठी आलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. या प्रकरणी कासा पोलिसांनी 110 जणांना अटक केली. हा हल्ला गावात चोर आल्याच्या अफवेमुळे झाल्याचे समजते.
हल्ल्यात सुशीलगिरी महाराज (30), चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (70, रा. कांदिवली आश्रम) व चालक नीलेश तेलगडे (30) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तालुक्यातील दिवशी या ग्रामपंचायतमधील गडचिंचले येथे हा प्रकार घडला. मुंबईतील कांदिवली येथून सुरतकडे कारने जाणाऱ्या तिघांना गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील गडचिंचले येथे चोर समजून जमावाने रोखले. जमावाने त्यांच्यावर कोयती, कुऱ्हाडी आणि दगडांच्या सहाय्याने हल्ला केला. येथील वनचौकीवर कार्यरत वनरक्षकाने याची माहिती पोलिसांना दिली. तिथे आलेल्या पोलिसांवरही जमावाने हल्ला केला. त्यात चार पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांच्या चार गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.