मुंबई - रविवारी दुपारनंतर सगळीकडे पालघरची बातमी व्हायरल झाली. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. मॉब लिचिंग प्रकार अन्य राज्यात अथवा गेल्या ५ वर्षात राज्यातही घडले आहेत. हे घडायला नको ही आपली संस्कृती नाही. मला राजकारण करायचं नाही. पण ही घटना पालघरच्या ११० किमी अंतरावर म्हणजे केंद्रशासित प्रदेश दादरा-नगर हवेलीनजीक घडलं. पालघरमध्ये ज्या गावात ही घटना घडली हा दुर्गम भाग आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे.
या घटनेबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, दादरा-नगर हवेली सीमेवर त्यांना अडवण्यात आलं. या साधूंना पुन्हा मागे पाठवण्यात आलं. दादरा-नगर हवेली केंद्रशासित प्रदेश असताना त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यापेक्षा त्यांना रात्रभर ताब्यात घेऊन महाराष्ट्र सरकारशी बोलून त्यांना ताब्यात द्यायला हवं होतं. पण तसं झालं नाही. गेल्या काही दिवसांपासून या भागात चोराची अफवा पसरली आहे. गैरसमजुतीने त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांसमोर ही घटना घडली आहे, यातील २ पोलिसांना निलंबितही केलं आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवे बंद करण्याचं आवाहन केलं होतं त्या दिवशी ही घटना घडली तेव्हा रात्री साडेबारा वाजल्यापासून पहाटे ५ पर्यंत पालघरच्या पोलीस अधीक्षक आणि पोलिसांनी जंगलात फिरून १०० पेक्षा जास्त आरोपींना पकडलं होतं. हे आरोपी तुरुंगात आहेत. त्यांना १८ तारखेला कोर्टात हजर केल्यानंतर ३० तारखेपर्यंत त्यांना कस्टडीत ठेवलं आहे. या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करु नका, या घटनेतील कोणत्याही दोषींना सोडणार नाही. सीआयडी गुन्हे शाखेचे डीआयडी अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वात पुढील तपास होईल. या घटनेतील जबाबदार सगळेच तुरुंगात आहेत. जे फरार आहेत त्यांना शोधून शिक्षा दिली जाईल. हिंदू-मुस्लीम नजरेने या घटनेकडे पाहू नका असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं.
दरम्यान, गैरसमजुतीतून हा प्रकार घडला आहे. हा दुर्गम भाग आहे याबाबत अमित शहांशी माझं बोलणं झालं. या परिसरात आजूबाजूला कोणताही धार्मिक कार्यक्रम होत नाही असं सांगितलं. त्यांनाही ही गोष्ट माहिती आहे. काळजी घ्यावी अशी सूचना त्यांनी केली आहे. त्यामुळे जो विश्वास तुम्ही राज्य सरकारवर दाखवता आहे. त्या विश्वासाच्या जोरावर आम्ही हे युद्ध जिंकणार आहोत. सोशल मीडियावर आग भडकवण्याचा प्रयत्न करत असेल त्यांचा शोध लावला जाईल. त्यांच्यावरही कठोर शासन केले जाईल असं इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
कोरोनाविरुद्ध युद्ध ही आपली प्राथमिकता
आजपासून काही जिल्ह्यात लॉकडाऊन शिथील केला आहे. संकट टळलंय असा समज करुन घेऊ नका, थांबलेलं अर्थचक्र पुन्हा सुरु करण्यासाठी सुरुवात केली आहे. लॉकडाऊन उठवलंय असं समजून गर्दी कराल तर कदाचित आणखी काही दिवस कडक निर्बंध लावण्यात येतील. राज्यात पहिला रुग्ण सापडल्यानंतर सहा आठवडे होत आहेत. नाईलाजास्तव तुम्हाला घरात बसावं लागत असेल. कोरोनाविरुद्ध युद्ध ही आपली प्राथमिकता आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.