मुंबई - गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पालघर हत्याकांडाबद्दल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून चर्ची केली. पालघरची जी दुर्दैवी घटना झाली त्यात ३ लोकांची हत्या करण्यात आली. ज्या परिसरात ही घटना झाली तो अतिशय दुर्गम भाग आहे. त्याठिकाणी काही अफवा पसरली होती की रात्रीचं काही लोक येतात मुलांना पळवतात. त्यातून ही घटना झाली. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. मात्र ही घटना झाल्यानंतर ८ तासाच्या आत १०१ लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अनेक जण जंगलात पळाले होते त्यांना शोधून काढलं. या १०१ आरोपींमध्ये एकसुद्धा मुस्लीम बांधव नव्हता, ही यादी मी सोशल मीडियात फिरवणार आहे असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे गृहमंत्री देशमुख यांनी १०१ आरोपींची नावासह यादी जाहीर केली आहे.
पालघर हत्येच्या घटनेवेळी हे लोक ओय बस, ओय बस असा आवाज दिला जात होता याचा अर्थ बस थांबवा असा होता. मात्र याचा उल्लेख शोएब बस असा करण्यात आला. आदिवासी भाषेत हे लोक बोलत होते. त्यामुळे शब्दाचा विपर्यास करुन याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाची लढाई लढत आहे. पोलीस, आरोग्य कर्मचारी सर्व यंत्रणा कोरोनाशी लढतेय अशातच जातीचं राजकारण करण्याचा काही मंडळींना प्रयत्न केला तो दुर्दैवी आहे. आज राजकारण करण्याची गरज नाही. एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. पण मुंगेरीलाल के हसीन सपने पाहण्याचा काही जणांचा प्रयत्न आहे. कोरोनाच्या लढाईत सर्वांनी एकत्र येऊन आपल्याला जिंकायचं आहे असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हटले आहे.
दरम्यान, फेसबुक लाईव्हच्या माध्यमांतून संवाद साधल्यानंतर गृहमंत्र्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन १०१ आरोपींची यादीच नावासह प्रसिद्ध केली आहे. तसेच काही विघ्नसंतोषी लोकं या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत होते, त्यांनी आवर्जून पाहावी, असेही देशमुख यांनी ट्विटमध्ये सांगितलंय.
दरम्यान, वाधवाना प्रकरणावरही ते फेसबुकच्या माध्यमातून बोलले आहेत, आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या फार मोठ्या चुकीमुळे वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्याची परवानगी दिली. त्या वाधवान कुटुंबाचा दुपारी २ वाजता क्वारंटाइनची वेळ संपतेय. त्यामुळे पोलीस खात्याकडून ईडी आणि सीबीआय यांना पत्र लिहून कळवलं आहे. आज दुपारी २ नंतर वाधवान कुटुंबाला ताब्यात घ्यावं. सीबीआयचे अधिकारी जो पर्यंत वाधवान कुटुंबाला ताब्यात घेत नाही तोपर्यंत ते आमच्या ताब्यात असतील. गेल्या १५ दिवसांपासून त्यांना एका हायस्कूलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे. राज्य शासन कोणत्याही परिस्थितीत वाधवान कुटुंबाला पाठीशी घालत नाही असं स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे.
आणखी वाचा...
लॉकडाऊनमुळे नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर; ट्रम्प संकटात
एड्स, स्वाईन फ्ल्यू अमेरिकेतून पसरला; कोणी जबाबदार धरले का? चीनचा सवाल
फेसबुक-Reliance Jioचा 'मेगा प्लॅन'; तीन कोटी दुकानदार, शेतकरी होणार मालामाल
हास्यास्पद! पाकिस्तानात ६० वर्षांचा वृद्ध 'गर्भवती'; खासगी लॅब सील करण्याची वेळ