Palghar Mob Lynching: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे पालघरच्या मॉब लिंचिंगचा तीव्र निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 11:28 PM2020-04-20T23:28:56+5:302020-04-20T23:52:23+5:30

दोषींवर कडक कारवाई आणि सखोल चौकशीची मागणी

Palghar Mob Lynching: Marxist Communist Party strongly condemns Palghar's lobbying | Palghar Mob Lynching: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे पालघरच्या मॉब लिंचिंगचा तीव्र निषेध

Palghar Mob Lynching: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे पालघरच्या मॉब लिंचिंगचा तीव्र निषेध

Next

मुंबई - १६ एप्रिलला रात्री पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात जो मॉब लिंचिंगचा घृणास्पद प्रकार झाला, त्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची महाराष्ट्र राज्य कमिटी जळजळीत निषेध करत आहे. या हल्ल्यात तीन जण मारले गेले, त्यात मुंबईहून सुरतला जाणारे दोन साधू होते. या कृत्यास जबाबदार असलेल्या गुन्हेगारांना अत्यंत कडक शिक्षा व्हावी आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी माकप करत आहे. 

आज मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव ठाकरे यांनी ह्या प्रकरणाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेला उद्देशून जे भाषण केले, त्याचे आम्ही स्वागत करतो. त्यात त्यांनी पुढील मुद्दे अधोरेखित केले: १. ही घटना गेली सहा वर्षे देशात अनेक ठिकाणी झालेल्या धर्मांध मॉब लिंचिंग सारखी नव्हती, तर ती गैरसमजातून झाली. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून रात्री चोर येत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या, आणि ते या घटनेमागील कारण होते. २. ह्या घटनेला कोणताही धर्मांध रंग नाही आणि तसा रंग तिला देण्याचा कोणीही प्रयत्न करता कामा नये. ३. या प्रकरणात १००हून अधिक लोकांना अटक करण्यात आली असून त्यात या कृत्यातील पाच प्रमुख आरोपींचा समावेश आहे. जे दोषी सिद्ध होतील त्यांना अत्यंत कडक शिक्षा दिली जाईल. ४. दोन पोलिसांना या प्रकरणात ताबडतोब निलंबित करण्यात आले आहे. ५. ह्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल.

या चौकशीमध्ये पुढील बाबींचाही तपास झाला पाहिजे: गुजरातला जाणाऱ्या या गाडीला अधिकृत परमिट देण्यात आली होती का? मुंबई ते सूरत जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग सोडून ती गाडी महाराष्ट्र आणि दादरा नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशाच्या अत्यंत दुर्गम भागातून का नेण्यात आली? त्या दुर्गम भागाच्या ओसाड पट्ट्यात रात्रीच्या वेळेस त्या गाडीला जाण्याची परवानगी दिली होती का, व दिली असल्यास कोणी दिली? 

आर.एस.एस. व भाजप 'ओव्हरटाइम' काम करून या घटनेला सपशेल चुकीचा धर्मांध रंग चढवण्याचा जो कसून प्रयत्न करत आहेत, त्याचा माकप उग्र निषेध करत आहे. ज्या समाजाने हा हल्ला केला त्या समाजाला धर्मांध वैमनस्याचा कोणताही इतिहास नाही. हे चांगले माहीत असूनही, विद्यमान राज्य सरकारला बदनाम करण्यासाठीच आर.एस.एस. व भाजपचे नेते ही विपर्यस्त मोहीम चालवत आहेत. 

आर.एस.एस. व भाजपचे नेते संबित पात्रा, सुनील देवधर व इतर अनेक जण फेसबुकवर जो धादांत खोटा प्रचार चालवत आहेत त्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तीव्र धिक्कार करत आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, ज्या डहाणू विधानसभा मतदारसंघात ही घटना घडली तो माकपचा बालेकिल्ला असून येथील विद्यमान आमदारही माकपचा आहे. त्यावरून ते अत्यंत निलाजरेपणाने हा धादांत खोटा आरोप करतात की, या कृत्यामागे माकप आहे. 

वस्तुस्थिती मात्र नेमकी उलट आहे. हे खून जेथे झाले त्या गडचिंचले गावाची ग्राम पंचायत गेली १० वर्षे भाजपच्या हातात आहे आणि तेथे विद्यमान सरपंच चित्रा चौधरी या भाजपच्याच आहेत. भाजपचे माजी आमदार पासकल धनारे (ज्यांना माकपचे विद्यमान आमदार कॉ. विनोद निकोले यांनी डहाणू-अज मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, काँग्रेस आणि कष्टकरी संघटनेच्या मदतीने २०१९च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत केले) यांनी स्वतःच्या फेसबुकवर १२ डिसेंबर २०१६ रोजी एक पोस्ट टाकली. त्यात स्वतः धनारे गडचिंचलेच्या भाजपच्या सरपंच चित्रा चौधरी व भाजपच्या इतर ग्राम पंचायत सदस्यांचा सत्कार करतानाचे चित्र आहे. या दोन साधूंच्या हत्येसाठी ज्यांना अटक करण्यात आली आहे, त्यातील अनेक जण भाजपचे आहेत. 

दोषींना कडक शिक्षा झालीच पाहिजे यात शंकाच नाही. पण त्याचबरोबर आपल्या स्वतःचा निष्काळजीपणा झाकण्यासाठी स्थानिक पोलीस मनमानीपणे गडचिंचलेपासून अनेक किलोमीटर दूरीवर असलेल्या गावांतील अनेक निरपराध लोकांनाही अटक करत आहेत हे माकप जनतेच्या नजरेस आणू इच्छिते. पोलिसांच्या दडपशाहीचा हा वरवंटा तात्काळ थांबला पाहिजे ही आमची मागणी आहे.

Web Title: Palghar Mob Lynching: Marxist Communist Party strongly condemns Palghar's lobbying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर