मुंबई - पालघरमधील गडचिंचले येथे चोर असल्याच्या संशयातून दोन साधूंसह वाहनचालक अशा तिघा व्यक्तींची जमावाने ठेचून निर्घृण हत्या केली. हा मॉब लिंचिंगचा क्रूर प्रकार मानवतेला काळिमा फासणारा असून या गुन्ह्यातील मारेकऱ्यांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
पालघरच्या गडचिंचलेजवळ घडलेला झुंडबळीचा निर्घृण क्रूर प्रकार महाराष्ट्राची मान खाली घालणारा असून याचा रिपब्लिकन पक्षाच्यावतीने तीव्र निषेध रामदास आठवले यांनी केला आहे. मागे असाच क्रूर प्रकार धुळे जिल्ह्यात साक्रीतील राईनपाडामध्ये घडला होता.
नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या गावोगावी जाऊन बहुरूपीचे काम करणाऱ्या लोकांना चोर समजून गावकऱ्यांनी क्रूर पद्धतीने ठार मारले होते. असे क्रूर प्रकार माणुसकीला काळिमा फासणारे असून ते रोखले पाहिजेत. त्यासाठी शासन आणि समाजाने ही दक्ष राहिले पाहिजे. अफवा पसरविणाऱ्यांना कठोर शिक्षा करून असे प्रकार रोखले पाहिजेत,असे रामदास आठवले म्हणाले. अनेक राजकारणी, खेळाडू आणि सेलेब्रेटींना देखील या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेला जातीय रंग देण्याचे काम करणाऱ्यावर कारवाई केली जाईल असे काल सांगितले होते.