मुंबई – लॉकडाऊन कालावधीत पालघरच्या गंडचिंचले गावात एका अफवेवरुन तीन जणांची सामूहिक हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यावरुन राज्य सरकारवर विरोधकांनी तोंडसुख घेतलं आहे. या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करु नये असं राज्य सरकारकडून बजावण्यात आलं आहे. आतापर्यंत १०१ आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
बुधवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या आरोपींची यादी सोशल मीडियावर जाहीर केली, यावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ते म्हणाले की, पालघर घटनेतील व्हिडीओमध्ये जे दिसत आहेत त्यांचीही नावे समोर आणा, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे झेडपी सदस्य काशिनाथ चौधरी दिसतात, गुन्हेगारांच्या यादीत सीताराम चौधरी दिसतात, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते सुनील रावते असाले त्याठिकाणी दिसतात ही वस्तूस्थिती समोर आणावी असं त्यांनी सांगितले आहे.
तसेच भगवी वस्त्र लाल झाली त्याचं राजकारण करु नये अशी टीका केली जाते, भगव्या विचारधारेने सत्तेत बसला मात्र आज भगव्या विचारधारेचं वक्तव्य केल्यावर धार्मिक तेढ निर्माण होते हा सत्तेतील बदल दिसत आहे. रुग्णांची संख्या वाढते, मृतांचा आकडा वाढतो, हॉस्पिटलची दुरावस्था आहे, याकडे राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज आहे असा टोला प्रविण दरेकर यांनी शिवसेनेला नाव न घेता लगावला आहे.
दरम्यान, भंडाऱ्याचे खासदार जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक मागत आहेत, मात्र रेड झोनमधून भंडाऱ्याला पोहचलेले प्रफुल्ल पटेल जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक करतात. हे सरकार राजकीय सुडबुद्धीने वागत आहे. सोशल मीडियावर कार्यकर्त्यांनी कोणतंही आक्षेपार्ह लिहिलं नसताना त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. अशाप्रकारे सुडाने वागू नये हे खपवून घेणार नाही असा इशारा देत तात्काळ गुन्हे मागे घ्यावेत अशा सूचना सरकारने संबंधितांना द्याव्या अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
या प्रकरणी पालघर सामूहिक हत्याकांडाच्या निमित्ताने काही लोक जातीचे राजकारण करत आहेत. प्रत्यक्षात अटक करण्यात आलेल्या १०१ आरोपींमध्ये एकही मुस्लिम बांधव नाही. काही लोक जाणूनबुजून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाशी अवघे राज्य लढा देत असताना असे राजकारण करणे ही दुर्दैवी बाब आहे, अशी टीका गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधकांवर केली होती.