मुंबई : पालघरच्या डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर आल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या जमावाने दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाला हत्या केल्याची घटना १६ मार्च रोजी घडली. या घटनेवरुन सोशल मीडियावर वादंग उठले असून संबंधित घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. तसेच, या घटनेनंतर अनेकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवर एक व्यंगचित्र शेअर केले आहे. नितेश राणे यांनी ट्विटरवर शेअर केलेले व्यंत्रचित्र हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि एका साधूचे आहे. तसेच, या शेअर केलेल्या व्यंगचित्राला त्यांनी 'शब्द नाहीत' (No words!) असे शिर्षक दिले आहे.
दरम्यान, याआधी याच प्रकरणावरून नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राज्यात ‘गर्व से कहो हम हिंदू है’ अशी परिस्थितीत होती. तर उद्धव ठाकरे यांच्या राज्यात ‘डर से रहो अगर हिंदू हो,’ असा फरक आहे, अशी टीका नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती.
याशिवाय अन्य एक ट्विट करून नितेश राणे यांनी “पालघरमध्ये घडलेल्या घटनेने राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिल्याचे दिसत नाही. काय घडतंय यावर कोणाचेही नियंत्रण नाही. लोक आपला संयम गमावत आहेत आणि ही एक सुरूवात आहे. सरकार आपले संपूर्ण नियंत्रण गमावत आहे,” असे सुद्धा म्हटले होते.