Join us

Palghar Mob Lynching: पालघरच्या घटनेवरुन विरोधक आक्रमक, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 7:58 AM

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा पूरता बोजवारा उडाला आहे, विरोधकांची टीका

ठळक मुद्देपालघरच्या हत्याकांडाने गृह खात्याची अब्रू वेशीवर टांगली गेलीयतात्काळ या घटनेची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजेविरोधकांची राज्य सरकारकडे मागणी

मुंबई – राज्यात एकीकडे कोरोना व्हायरसचं संकट उभं असताना दुसरीकडे पालघरमधील सामूहिक हत्याकांडाने राज्यात खळबळ माजली आहे. चोर समजून जमावाने तिघांची हत्या केल्याने राज्य सरकारबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विरोधकांनीही राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला आहे.

याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधताना म्हणाले की, पालघरमधील सामूहिक हत्याकांडाचे प्रकरण अत्यंत घृणास्पद आहे. ज्या प्रकारे लोकांनी पोलिसांसमोर अक्षरश: काठ्यांनी मारहाण करुन हत्या केली. पोलीस काहीच करु शकले नाही. हे लज्जास्पद आहे. तात्काळ या घटनेची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. पोलिसांवर आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे का हा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेशी चौकशी केलीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

त्याचसोबत राज्यात कायदा सुव्यवस्थेचा पूरता बोजवारा उडाला आहे. पालघरच्या हत्याकांडाने गृह खात्याची अब्रू वेशीवर टांगली गेलीय. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारुन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

गुरुवारी रात्री डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली. चोर आल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या जमावाने तिघांची हत्या केली. यावेळी लोकांची समजवण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही या जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात सुशीलगिरी महाराज, चिकने महाराज कल्पकवृक्षगिरी आणि  नीलेश तेलगडे या तिघांचा जागी मृत्यू झाला.

दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली असून यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोषींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. तसेच या प्रकरणावरुन धार्मिक तेढ निर्माण करु नये, कुणीही या घटनेचं विवाद करुन सामाजिक/जातीय तेढ निर्माण करत नाही यावरही सरकार लक्ष ठेऊन आहे. अन्यथा त्यांच्यावरही कारवाई करु असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी इशारा दिला आहे.

 

टॅग्स :पालघरउद्धव ठाकरेअनिल देशमुखदेवेंद्र फडणवीसप्रवीण दरेकर