Palghar Mob Lynching:..मग तेव्हा हा हिंदूह्दयसम्राटांचा महाराष्ट्र नव्हता का?; शिवसेनेचा भाजपावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 08:33 AM2020-04-21T08:33:36+5:302020-04-21T08:37:38+5:30
आजही महाराष्ट्राचा ग्रामीण भाग अज्ञान, अंधश्रद्धा आणि अफवांच्या जाळय़ात अडकला आहे
मुंबई - महाराष्ट्रात दोन साधूंची हत्या झाली, समाज माध्यमांवर धार्मिक भेदाभेदीचे विष पेरले गेले तरीही महाराष्ट्रात धार्मिक उन्माद उसळला कसा नाही? त्यामुळे अनेकांना वैफल्य येणे साहजिकच आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांच्या राज्यात हिंदू साधूंची हत्या होते यावर काहींनी चिंता व्यक्त केली आहे. या चिंतेमागचे खरे कारण वेगळेच आहे. विरोधी पक्षनेत्यांनीही समाज माध्यमांवर या घटनेवरून अश्रूंचा पूर वाहिला आहे. पण याआधी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात धुळय़ात पाच आणि चंद्रपुरात एका हिंदू गोसाव्याची जमावाने अशीच निर्घृण हत्या केली होती. तेव्हा हा हिंदुहृदयसम्राटांचा महाराष्ट्र नव्हता काय? असा सवाल सामना अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपाला आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.
तसेच गोमांस भक्षणप्रकरणी दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेशात सतत मॉब लिंचिंग झाले, पण मरणारे मुसलमान होते म्हणून बेगडी हिंदुत्ववादी उन्मादाने नाचत होते. हत्या कोणाचीही असो, ती वाईटच. एखाद्याच्या हत्येने जो आनंद व्यक्त करतो ती एक विकृतीच मानावी लागेल. मग आपल्यात व ओसामा बिन लादेन, मसूद अझहर वगैरे निर्घृण लोकांमध्ये फरक काय? मॉब लिंचिंग एक विकृती आहे व या विकृतीचे समर्थन कोणालाही करता येणार नाही. पालघरच्या घटनेनंतर एका विशिष्ट विचारांचे तसेच संस्था आणि संघटनेशी संबंधित लोक बोलू आणि लिहू लागले आहेत. हेसुद्धा खतरनाक आहेत असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
- पालघरजवळ झालेल्या दोन साधूंच्या हत्येने महाराष्ट्राच्या परंपरेस हादरा बसला हे खरे. असा हादरा बसावा म्हणून कोणी हे सर्व घडवले नाही ना? पण त्यातील गुन्हेगारांना कठोर शासन होईल आणि एकही आरोपी सुटणार नाही असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी दिला आहे.
- आजही महाराष्ट्राचा ग्रामीण भाग अज्ञान, अंधश्रद्धा आणि अफवांच्या जाळय़ात अडकला आहे. त्यातूनच चंद्रपूर, धुळे आणि डहाणू–पालघरसारख्या घटना घडत आहेत. महाराष्ट्रात साधूंची भगवी वस्त्र रक्ताने भिजली याचे राजकारण कोणी करू नये.
- पालघर परिसरात दोन साधूंची जमावाने निर्घृणपणे हत्या केली. या सर्व घटनेचा धिक्कार करावा तेवढा थोडाच! हा सर्व प्रकार म्हणजे महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रकार आहे हे आता उघड होऊ लागले आहे. कारण काही मंडळींनी यासही हिंदू-मुसलमान असा रंग देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
- साधूंची हत्या जितकी निषेधार्ह, साधूंचे रक्त सांडणे जितके निर्घृण आणि अमानुष तितकेच अमानुष या प्रकरणास धार्मिक रंग देण्याचे कारस्थान आहे. साधूंवर हल्ला करणारे जितके नराधम आहेत तितकेच नराधम या प्रकरणास जातीय आणि धार्मिक रंग देणारे आहेत.
- ‘लॉक डाऊन’च्या काळात या साधूंना महाराष्ट्राची सीमा पार करायची होती व तेच त्यांच्यासाठी घातक ठरले. या साधूंना तेथील प्रशासनाने ताब्यात ठेवून महाराष्ट्र सरकारला कळवले असते तर कदाचित मार्ग निघाला असता, पण तसे घडले नाही व साधूंना प्राण गमवावा लागला.
- जेथे ही दुर्घटना घडली तो आदिवासीबहुल परिसर आहे. गुजरातच्या सीमेवरील डहाणूजवळ हे घडले. जे घडले ते भयंकरच आहे व पोलिसांनी तत्काळ हल्ला करणार्याया जमावात सामील झालेल्या शंभरावर लोकांना अटक केली. त्यामुळे पोलीस काय करीत होते? सरकार झोपले होते काय? हे प्रश्न निरर्थक आहेत.
- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे एक कार्यक्षम मंत्री आहेत. याप्रकरणास धार्मिक रंग देऊन चिथावणी देणाऱ्यांचे कारस्थान राज्याच्या गृहमंत्र्यांनी हाणून पाडले आहे. ज्यांची हत्या झाली ते व ज्यांनी हत्या केली तो जमाव एकाच धर्माचा आहे. दोन्ही बाजूला हिंदूच आहेत. त्यामुळे धार्मिक रंग देऊ नका असे ठणकावून सांगण्यात आले.
- काहींचा हिंदुत्ववाद या निमित्ताने उफाळून आला आहे, पण या उफाळणार्याया उकाळ्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की, ज्या गडचिंचले गावात ही दुर्घटना घडली ते गाव व ग्रामपंचायत गेली दहा वर्षे पूर्णपणे भाजपच्या ताब्यात आहे. सरपंच भाजपचाच आहे. म्हणजे मारहाण करणाऱ्यांचा रंग कोणता, हे सांगायला नको. पण आम्हाला या प्रकरणास राजकीय रंग देण्याची इच्छा नाही.