मुंबई – पालघरची जी दुर्दैवी घटना झाली त्यात ३ लोकांची हत्या करण्यात आली. ज्या परिसरात ही घटना झाली तो अतिशय दुर्गम भाग आहे. त्याठिकाणी काही अफवा पसरली होती की रात्रीचं काही लोक येतात मुलांना पळवतात. त्यातून ही घटना झाली. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. मात्र ही घटना झाल्यानंतर ८ तासाच्या आत १०१ लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अनेक जण जंगलात पळाले होते त्यांना शोधून काढलं. या १०१ आरोपींमध्ये एकसुद्धा मुस्लीम बांधव नव्हता, ही यादी मी सोशल मीडियात फिरवणार आहे असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
तसेच घटनेच्या वेळी हे लोक ओय बस, ओय बस असा आवाज दिला जात होता याचा अर्थ बस थांबवा असा होता. मात्र याचा उल्लेख शोएब बस असा करण्यात आला. आदिवासी भाषेत हे लोक बोलत होते. त्यामुळे शब्दाचा विपर्यास करुन याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाची लढाई लढत आहे. पोलीस, आरोग्य कर्मचारी सर्व यंत्रणा कोरोनाशी लढतेय अशातच जातीचं राजकारण करण्याचा काही मंडळींना प्रयत्न केला तो दुर्दैवी आहे. आज राजकारण करण्याची गरज नाही. एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. पण मुंगेरीलाल के हसीन सपने पाहण्याचा काही जणांचा प्रयत्न आहे. कोरोनाच्या लढाईत सर्वांनी एकत्र येऊन आपल्याला जिंकायचं आहे असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
त्याचसोबत आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या फार मोठ्या चुकीमुळे वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्याची परवानगी दिली. त्या वाधवान कुटुंबाचा दुपारी २ वाजता क्वारंटाइनची वेळ संपतेय. त्यामुळे पोलीस खात्याकडून ईडी आणि सीबीआय यांना पत्र लिहून कळवलं आहे. आज दुपारी २ नंतर वाधवान कुटुंबाला ताब्यात घ्यावं. सीबीआयचे अधिकारी जो पर्यंत वाधवान कुटुंबाला ताब्यात घेत नाही तोपर्यंत ते आमच्या ताब्यात असतील. गेल्या १५ दिवसांपासून त्यांना एका हायस्कूलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे. राज्य शासन कोणत्याही परिस्थितीत वाधवान कुटुंबाला पाठीशी घालत नाही असं स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे.