नवी दिल्ली : पालघर येथे २०२० साली तीन जणांची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याबाबत महाराष्ट्र सरकारला आक्षेप नसेल, तर आम्ही अशा चौकशीचे आदेश का द्यावेत, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला. यासंदर्भात महाराष्ट्र सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पालघर येथील हत्याकांडप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यास महाराष्ट्र सरकारचा विरोध नाही, असे राज्याच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला बुधवारी सांगितले. अशी स्थिती असल्यास पालघरप्रकरणी आमच्यापेक्षा महाराष्ट्र सरकारनेच सीबीआयचे चौकशीचे आदेश द्यावेत, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटले आहे. या हत्याकांडाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यास महाविकास आघाडी सरकारने विरोध दर्शविला होता. मात्र, त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले.
हत्या झालेले कांदिवलीचे रहिवासी
मुंबईतील कांदिवली भागात राहाणारे तीन जण गुजरातमधील सुरत येथे एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी कारने प्रवास करत असताना १६ एप्रिल २०२० रोजी रात्री त्यांची पालघरमधील एका गावात संतप्त जमावाने हत्या केली होती.