लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पालघर येथे साधू व त्याच्या वाहन चालकाची हत्येचा आरोपी असलेल्या १० जणांची उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामिनावर सुटका केली, तर आठ जणांचा जामीन अर्ज फेटाळला. हत्येसाठी १० जणांना जबाबदार धरता येईल, असे कोणतेही कृत्य केल्याचे उघड होत नाही, असे म्हणत न्या. भारती डांग्रे यांच्या एकलपीठाने १० जणांना जामीन मंजूर केला. अर्जदार घटनास्थळी उपस्थित होते आणि त्यांच्या हातात शस्त्रे होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांनी कोणते कृत्य केले, हे स्पष्ट होत नाही, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. तर इतर ८ जण साधूला मारहाण करत असल्याचे व इतरांनाही मारहाणीसाठी हाका देत असल्याचे सीसीटीव्हीद्वारे उघड झाल्याने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.
साधू व त्याच्या चालकाने, आपण नाशिकमधले असून गुरूंच्या अंतिम दर्शनासाठी जात असल्याचे सांगूनही गावकऱ्यांना ते दोघेही दरोडेखोर वाटले. त्यांच्यावर दगडफेक केली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. गेल्यावर्षी जानेवारीत ठाणे सत्र न्यायालयाने ८९ आरोपींची जामिनावर सुटका केली, तर या १८ जणांचा जामीन नामंजूर केल्याने त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.