पालघर भ्रष्टाचाराचे होणार सोशल आॅडिट
By admin | Published: December 4, 2014 11:51 PM2014-12-04T23:51:48+5:302014-12-04T23:51:48+5:30
पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड या आदिवासी बहुल, भागातील रोहयोअंतर्गत कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आल्यानंतर
हितेन नाईक, पालघर
पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड या आदिवासी बहुल, भागातील रोहयोअंतर्गत कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आल्यानंतर डहाणू तालुक्यातील वाघाडी, वनई इ. गावामध्ये पंचायत समिती अंतर्गत राबविलेल्या योजनेतही अशाच प्रकारच्या भ्रष्टाचार झाल्याचे वास्तव माहितीच्या अधिकारामध्ये समोर आले आहे.
डहाणू तालुक्यातील वाघाडी गावातील कमळाकर गोपाळ कामडी यांच्या विहीरीचे काम पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले असून मजुरीपोटी ३३ हजार १२ रू. व लाभार्थ्यांने सिमेंट, रेती, दगड इ. साठी खर्च केलेले ३६ हजार ६८५ असे एकुण ७१ हजार ६९७ इ. रू. चे येणे बाकी आहे. या संदर्भात कष्टकरी संघटनेने माहितीच्या अधिकारात मागीतले त्या माहितीमध्ये दोन वेगवेगळी उत्तरे देत एका माहितीत ९८ हजार ६४२ रू. तर दुसऱ्या माहितीत ८७ हजार ३९५ रू. खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. तर या कामामध्ये पंचायत समितीकडून ४६ हजार ३७० रू. चे बांधकाम मटेरीयल टाकण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर नवशा रामा पवार यांनी आपल्या शेतात खोदाई केलेल्या व बांधकाम केलेल्या विहिरीसाठी मजुरीचे २४ हजार ४३८ रू. व दगड, सिमेंट, रेती यांचा खर्च ४२ हजार दाखविण्यात आला आहे. मात्र त्यांनी मागीतलेल्या माहितीमध्ये या कामापोटी १ लाख ३४ हजार २४८ रू. ची रक्कम देण्यात आली आहे.
अंत्या हिरा भोईर यांच्या शेतात तीस फूट विहिर खोदण्यात आली असून ही आजही अपूर्णावस्थेत पडून आहे. त्यांच्या मस्टरवर त्यांनी खर्च केलेले २१ हजार २१२ तर बांधकाम साहित्याचे २६ हजार तर पंचायत समितीने ११ हजार ८७५ रू. चा खर्च दाखविण्यात आला असला तरी त्या शेतकऱ्यांच्या हातात एक छदामही पडलेला नाही. मजूर आणि गवंड्यांच्या फेऱ्या मात्र त्यांच्या दारात आजही सुरूच आहेत. अशाच सखाराम पिलेना, बाबु झिपर, जन्या धागडा व माणीक सातवी इ. शेतकऱ्यांच्या व्यथा या सर्वांपेक्षा वेगळ्या नसल्याचे दिसून आले.
वनई येथील केशव लक्ष्मण तांबडा, बाबु लक्षा शिंगडा, कृष्णा वरठा, मेहादू तांडेल, जानु भवार, आंबोळी येथील लहान्या कोडे, चांदवड येथील दिव्या घाटाळ, धामणगाव येथील हनुमान वाघाड इ. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील विहिरी महत्प्रयासाने खोदून बांधकामही केले आहे. मात्र डहाणू पंचायत समिती कार्यालयाचे खेटे घालून हे शेतकरी हवालदिल झाले आहेत. डहाणू पंचायत समितीच्या या योजनेंतर्गत काही शेतकऱ्यांना आपला खर्च काही प्रमाणात मिळाला असला तरी अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहीले आहेत. त्यांनी विहिरीच्या बांधकामासाठी आॅर्डर दिलेल्या रेती, सिमेंट, दगड इ. च्या पैशासाठी मालकाने तगादा लावला आहे. रोहयो योजनेंतर्गत प्रथम १ लाख ४० हजाराची विहिरीची किंमत मंजूर असताना वाढीव बांधकाम करावे लागणार असे भासवून सदर विहिरीची किंमत १ लाख ९० हजारापर्यंत नेण्यात आल्याची उदाहरणे ही माहिती अधिकारात समोर आल्याचे कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांनी सांगितले. (वार्ताहर)