मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील महापुराने अतोनात हाल झालेल्या नागरिकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी हजारो हात सरसावले असताना एका पोलीस अंमलदाराने एक दिवस नव्हे तर पूर्ण महिन्याचे वेतन मदतनिधीसाठी देऊन आपले औदार्य दाखविले आहे. सहाय्यक फौजदार सुरेश सुभाष शिवदे असे त्यांचे नाव असून, ते पालघर पोलीस दलात नियंत्रण कक्षात नियुक्तीला आहेत.कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जीवितहानीबरोबरच हजारो कोटींची हानी झाली आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी राज्यभरातून मदतीचे ओघ सुरू आहेत. पूरग्रस्तांसाठी सर्वस्तरावरून मदत करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने पालघरचे जिल्हा अधीक्षकांनी मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देताना नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या सहाय्यक फौजदार शिवदे यांनी आपल्या ऑगस्ट महिन्याचे पूर्ण वेतन पूरग्रस्तनिधीसाठी जमा करण्यात यावा, असे लेखी पत्र अधीक्षकांना दिले आहे. अन्य अधिकारी व सहकाऱ्यांनी भरघोस मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.