पल्लवी विकमसीची आत्महत्याच! ‘आयसीएआय’च्या अध्यक्षांची मुलगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 03:11 AM2017-10-08T03:11:30+5:302017-10-08T03:12:19+5:30
द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडिया’चे (आयसीएआय) अध्यक्ष निलेश विकमसी यांची मुलगी पल्लवीने लोकलमधून उडी मारून आयुष्य संपविल्याची माहिती पोलीस तपासातून उघड झाली आहे.
मुंबई : द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडिया’चे (आयसीएआय) अध्यक्ष निलेश विकमसी यांची मुलगी पल्लवीने लोकलमधून उडी मारून आयुष्य संपविल्याची माहिती पोलीस तपासातून उघड झाली आहे. मात्र या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
विधि अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या परळच्या पल्लवी विकमसीने (२१) बुधवारी आत्महत्याच केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. शनिवारी या प्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी तिघांचे जबाब नोंदविले. यामध्ये ठाणे येथील रहिवासी प्रत्यक्षदर्शी गीता गायकवाड यांनी पोलिसांना सांगितले की, ‘मी भायखळा स्थानकात लोकलमध्ये द्वितीय श्रेणीच्या डब्यात चढले. लागूनच असलेल्या प्रथम श्रेणीच्या डब्यात बसलेली पल्लवी चिंचपोकळी स्थानक गेल्यावर दरवाजाजवळ उभी राहिली. ती सारखी बाहेर डोकावत होती. नंतर करी रोड स्थानक गेल्यानंतर ती खाली पडली. ही बाब लक्षात येताच मी रेल्वे पोलीस हेल्पलाइनला याबाबत कळविले. त्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पुढे मी ठाण्याला उतरले.’
गायकवाड यांच्यासह करी रोड स्टेशनमास्तर एस. एल. मीना आणि सहाय्यक सचिन तळेकर यांचेही जबाब नोंदविण्यात आले आहेत. तिला केईएम रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनास्थळावरून तिचा मोबाइलही सापडला नसल्याचे त्यांनी जबाबात नमूद केल्याची माहिती दादर रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन बोबडे यांनी दिली.
शनिवारी तिच्या कुटुंबीयांचे देखील जबाब नोंदविण्यात आले. काही दिवसांपासून ती तणावात होती. त्यातूनच तिने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आली. ती वैयक्तिक कारणास्तव तणावात होती, त्यामुळे ते कारण आम्ही सांगू शकत नसल्याचे पोलीस उपआयुक्त मनोज शर्मा म्हणाले.
मोबाइल गेला कुठे?
करी रोड स्थानकादरम्यान पल्लवीने मोबाइल फेकून दिल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तिच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन हे करी रोड स्थानक आले होते. मात्र अद्याप तिच्या मोबाइलबाबत काहीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही.
पल्लवीला वाहिली श्रद्धांजली
पल्लवीला श्रद्धांजली वाहण्यासाठी दादरच्या स्वामी नारायण मंदिराच्या हॉलमध्ये शनिवारी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तिच्या कुटुंबीयांसह नातेवाइकांनी तिच्या आठवणींना उजाळा देत तिला श्रद्धांजली वाहिली.