मुंबई - वडाळ्यातील वकीलपल्लवी पुरकायस्थ हत्याप्रकरणातील पसार सुरक्षा रक्षक सज्जाद मुघल उर्फ इलियास पठाणला आज (मंगळवारी) जम्मू काश्मीरमध्ये अटक केली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पॅरोलवर बाहेर पडलेला सज्जाद फरार झाला होता.
मुंबईतील वडाळा परिसरातील हिमालयन हाईट्स या सोसायटीत राहणा-या पल्लवीची ९ आॅगस्ट २०१२ रोजी राहत्या घरी निघृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. पल्लवी ही एका खासगी कंपनीत वकील म्हणून कार्यरत होती. याप्रकरणात गुन्हे शाखेने शिताफिने सज्जादला बेड्या ठोकल्या. ३० आॅक्टोंबर २०१२ रोजी सज्जाद विरुद्ध ४३५ पानाचे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. त्याने पल्लवीचा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यामुळे त्याने धारदार शस्त्राने पल्लवीची हत्या केल्याचे त्यात नमूद करण्यात आले. सज्जादला ७ जुलै २०१४ मध्ये न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली होती.
मुळचा जम्मू काश्मीरचा रहिवासी असलेल्या सज्जादने आईची प्रकृती स्थिर नसल्याचे कारण पुढे करत पॅरोलवर बाहेर सोडण्याची मागणी केली. जम्मू काश्मीरच्या स्थानिक पोलीस ठाण्याला रोज हजेरी लावण्याच्या अटीवर २८ फेब्रुवारी २०१६ मध्ये त्याचा ३० दिवसांचा पॅरोल मंजूर झाला. याच दरम्यान पॅरोल मंजुर झाल्यापासून मे अखेरपर्यंत सज्जादने स्थानिक पोलिसांना हजेरीच दिली नसल्याची माहिती समोर आली. त्यानुसार जम्मू काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रोड पोलिसांनी सज्जाद फरार झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पुढे हे प्रकरण तपासासाठी जम्मू काश्मीर पोलिसांकडे वर्ग केले होते.
त्यानुसार मुंबई गुन्हे शाखाही सज्जादचा शोध घेत होते. तो जम्मू काश्मीरमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने सापळा रचून सज्जादला जम्मू काश्मीर मधून अटक केली. मुंबई गुन्हे शाखेने मंगळवारी त्याला मुंबईत आणत या गुन्ह्यांत त्याला अटक दाखविली आहे. बुधवारी त्याचा ताबा नाशिक पोलिसांकडे देण्यात येणार आहे.
गेल्या वर्षभरापासून आम्ही सज्जादचा शोध घेत होतो. तो वेश बदलून जम्मू काश्मीर परिसरात छोटे मोठे काम करत होता त्यामुळे त्याचा शोध घेण्यास अडचण निर्माण होत होती. अखेर खात्रीलायक सूत्रांकडून त्याची माहिती मिळताच त्याला जम्मू काश्मीरमधून अटक केली. - दिलीप सावंत, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा