केईएमच्या डॉक्टरांना पॅलिएटिव्ह केअरचे प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 02:24 AM2018-10-13T02:24:31+5:302018-10-13T02:26:48+5:30
एखाद्या आजारात मृत्यू टाळता येण्यासारखा नसेल, तर वेदनादायी उपचार कुठे थांबवावेत, याबद्दलच्या जागृतीचा अभाव आणि मॉफिनसारख्या वेदनाशामक औषधांच्या वैद्यकीय वापरावर येणारी बंधने याविषयी पॅलिएटिव्ह केअरचे नवे क्षेत्र उदयास आले आहे.
मुंबई : एखाद्या आजारात मृत्यू टाळता येण्यासारखा नसेल, तर वेदनादायी उपचार कुठे थांबवावेत, याबद्दलच्या जागृतीचा अभाव आणि मॉफिनसारख्या वेदनाशामक औषधांच्या वैद्यकीय वापरावर येणारी बंधने याविषयी पॅलिएटिव्ह केअरचे नवे क्षेत्र उदयास आले आहे. मात्र सामान्यांना याविषयी माहितीचा अभाव आहे.
१३ आॅक्टोबर हा ‘वर्ल्ड हॉस्पाइस अॅण्ड पॅलिएटिव्ह डे’ साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर टाटा मेमोरिअलचे डॉक्टर केईएम रुग्णालयाच्या काही डॉक्टर व परिचारिकांना पॅलिएटिव्ह केअरचे प्रशिक्षण देत आहेत, अशी माहिती इंडियन असोसिएशन आॅफ पॅलिएटिव्ह केअरच्या अध्यक्षा डॉ. मेरी अॅन मकडेन यांनी दिली.
द मुंबई पॅलिएटिव्ह केअर नेटवर्कच्या माध्यमातून शुक्रवारी प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी डॉ. मकडेन यांनी सांगितले की, आपल्याकडे या क्षेत्राविषयी समाजातील बऱ्याच घटकांमध्ये माहिती नाही. केईएममधील डॉक्टरांना देण्यात येणाºया प्रशिक्षणाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात पालिका रुग्णालयात पॅलिएटिव्ह केअरविषयीचे विभाग सुरू व्हावेत असा मानसही त्यांनी व्यक्त केला.
हेमॅटोआॅन्कोलॉजिस्ट डॉ. बोमन दाभार यांनी या वेळी सांगितले, आपल्याकडे बºयाचदा केवळ वेदना व्यवस्थापनाविषयी चर्चा होते. त्याभोवती वैद्यकीय आरोग्य सेवा गुंतल्या जातात. मात्र दुर्धर आजारांनी वेढलेल्या रुग्णांचा आयुष्याच्या अखेरच्या वाटेवरचा प्रवास कमी वेदनादायी करण्यासाठी ही सेवा आहे. आपल्याकडे बºयाच वेळा केवळ कर्करोगग्रस्तांना ही सेवा पुरविली जाते. याशिवाय दुर्धर व्याधींनी ग्रस्त असलेल्या, काळजी घेण्यासाठी कोणीही नसलेल्या व्यक्तींनाही या माध्यमातून आधार देता येतो.
याप्रसंगी, सिप्ला पॅलिएटिव्ह केअर अॅण्ड ट्रेनिंग संस्थेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजिरी दिघे यांनी सांगितले की, गेल्या वीस वर्षांत संस्थेच्या माध्यमातून १४ हजार रुग्णांना आजमितीस मदत करण्यात आली आहे. मात्र शासकीय यंत्रणांमध्ये या क्षेत्राविषयी असलेली अनास्था दूर होणे अपेक्षित आहे, असेही त्यांनी सांगितले.